पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमधून दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा


नवी दिल्ली – आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात श्री गणेशाचे स्वागत करण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून यंदाही गणेशोत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत. कठोर निर्बंध या काळात देखील लागू करण्यात आले आहेत. पण, असे असले तरीही गणेशभक्तांच्या मनातील उत्साह कमी झालेला नाही. हा उत्साह पुढचे १० दिवस असाच कायम राहणार आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ च्या गजरात संपूर्ण वातावरण मंगलदायी झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत ट्विट करत देशवासियांना गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.


आपणा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. हा शुभ प्रसंग प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन येवो. गणपती बाप्पा मोरया!, असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

दरम्यान, गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना महाराष्ट्राबरोबरच देशभरात विविध ठिकाणी गणेशभक्तांकडून मोठ्या उत्साहात करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, बोरिवली, विरार यासारख्या मुंबईच्या लगतच्या उपगरांमध्ये सकाळपासूनच आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी सर्वांचीच लगबग दिसून आली.