नवी दिल्ली – वर्ल्ड कप पात्रता सामन्यात गोल्सची हॅट्र्ट्रिक करत लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाला विजय मिळवून दिला आहे. मेस्सीने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे अर्जेंटिनाने ३-० ने बोलिवियाचा पराभव केला. मेस्सीने या हॅट्र्ट्रिकसोबतच ब्राझीलचे महान खेळाडू पेले यांचा सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम मोडला आहे.
वर्ल्ड कप पात्रता सामन्यात मेस्सीने गोल्सची हॅट्ट्रीक करत अर्जंटिनाला मिळवून दिला विजय
मेस्सी दक्षिण अमेरिकी फुटबॉलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू ठरला आहे. ७९ गोल्सची नोंद ३४ वर्षीय मेस्सीच्या नावे झाली आहे. आतापर्यंत ७७ गोल्ससह पेले सर्वाधिक गोल्स करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू होते.
सामन्याच्या १४ व्या, ६४ व्या आणि ८८ व्या मिनिटाला मेस्सीने गोल केले. अर्जेंटिनाकडून १५३ वा सामना खेळताना मेस्सीने पहिला गोल करतच पेले यांच्या सर्वाधिक गोल्सची बरोबरी केली. यानंतर मार्टिनेजने केलेल्या पासवर गोल करत मेस्सीने पेले यांचा रेकॉर्ड मोडत नवा विक्रम केला. मेस्सीची आंतरराष्ट्रीय सामन्यात हॅट्ट्रिक करण्याची ही सातवी वेळ आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक गोल्स करण्याचा रेकॉर्ड मेस्सीचा प्रतिस्पर्धी रोनाल्डोच्या नावे आहे. रोनाल्डोने १८० सामन्यांमध्ये १११ गोल केले आहेत.
चार दिवसांपूर्वी झालेल्या वादानंतर अर्जेंटिनाला हा विजय मिळाला आहे. सोमवारी अर्जेंटिना आणि ब्राझीलचा सामना सुरु झाल्यानंतर सात मिनिटांनी रद्द करण्यात आला होता. अर्जेंटिनाच्या चार खेळाडूंनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर हा सामना रद्द करण्यात आला होता. यावेळी दोषी आढळलेले खेळाडून बोलिवियाविरोधात सामन्याचा भाग नव्हते.