चिपी विमानतळाच्या उद्धाटनाला मुख्यमंत्री आले, तर त्यांचे स्वागत करू; नारायण राणेंचा यु-टर्न


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल काही दिवसांपुर्वी जन आशिर्वाद यात्रे दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचे चित्र पहायला मिळाले. हा वाद निवळत असताना चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख तीन दिवसांपूर्वी ठरल्यानंतर कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी यायलाच पाहिजे, असे काही नसल्याचे राणे म्हणाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी यु-टर्न घेतला आहे. मुख्यमंत्री ठाकरे चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे त्यांनी म्हटले आहे.

माझे विकासाची प्रत्येक गोष्ट स्वप्नच आहे. मी स्वत: सिंधुदुर्गात विमानतळ बांधले आहे. मी मंत्री असताना बांधून पूर्ण केले आहे. ९ ऑक्टोबरला हे विमानतळ सुरू होत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. यात श्रेय कसले? जे कोण बोलत आहेत, त्यांचे सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचे श्रेय नाही. मी विमानतळ बांधून पूर्ण केल्यामुळे श्रेयाचा प्रश्न येतोच कुठे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्घाटनाला आले तर त्यांचं स्वागत करू, असे टीव्ही ९ मराठीशी बोलताना राणे म्हणाले.

नारायण राणेंनी यावेळी बोलताना गणेशोत्सवावरील निर्बंधावरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. सणांवर निर्बंध असू नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच फक्त हिंदूंच्याच सणावर असे निर्बंध घालणे योग्य नाही. मी असे निर्बंध मानत नाही. त्यांना काय करायचे ते करू देत, असेही राणे म्हणाले.