उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा


मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुखकर्ता, विघ्नहर्ता श्रीगणरायांच्या चरणी वंदन केलं असून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर करुन महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं श्रीगणरायांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण होईल. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा होईल. श्री गणरायांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही.

बुद्धीची देवता श्रीगणरायांच्या समस्त भक्त बंधू-भगिनींनी यंदाही सुरक्षित वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात घेतलेल्या कौतुकास्पद निर्णयामुळे राज्यातील कोरोनाचा संसर्ग रोखला जाईल, तसेच श्रीगणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव काळात सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.