विधानसभा निवडणुकीत बसप देणार नाही कोणत्याही माफियाला तिकीट


लखनौ – उत्तर प्रदेशातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान यावेळी माफियांना तिकीट न देण्याचा निर्णय मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाने घेतला आहे. त्यामुळे आमदार मुख्तार अन्सारी यांना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी बसपचे प्रदेशाध्यक्ष भीम राजभर हे त्यांच्या जागेवर मऊ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती बसप अध्यक्षा मायावती यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. मायावती यांच्या या निर्णयाकडे पक्षाची प्रतिमा नागरिकांमध्ये उंचवण्यासाठी घेतलेले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्याही माफियाला आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. उत्तर प्रदेशातील आझमगड विधानसभा मतदारसंघातून यासाठी मुख्तार अन्सारी ऐवजी बसप प्रदेशाध्यक्ष भीम राजभर यांना तिकीट देण्याचे निश्चित केल्याचे ट्वीट बसप अध्यक्ष मायावती यांनी केले आहे.

पक्ष प्रभारींना उमेदवारांची निवड करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन मायावती यांनी केले आहे. सरकार स्थापन केल्यानंतर अशा घटकांवर कठोर कारवाई करताना कोणतीच अडचण नको, म्हणून त्यांनी पक्षातील नेत्यांना ताकीद दिली आहे. दुसरीकडे, बांदा तुरुंगात बंद असलेले आमदार मुख्तार अन्सारी यांच्या मोठ्या भावाने समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. तेव्हापासून मायावती नाराज असल्याचे बोलले जात आहे. मुख्तार अन्सारी मागील विधानसभा निवडणूक बसपच्या तिकीटावर जिंकले होते. तर त्यांचा भाऊ अफजाल अन्सारी २०१९ मध्ये गाजीपूरमधून बसपच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.