गणेशोत्सवाचे स्वरूप

ganesha1
आजपासून महाराष्ट्रात मराठी संस्कृतीचा एक भाग ठरलेला गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्याने सुरू होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने जाणवणारे महापूरमुळे निर्माण झालेले वातावरण थोडे बदलले आहे. असे असले तरी काही वर्षांपासून गणेशोत्सवाचे स्वरूप वरचेवर व्यावसायिक होत चालले आहे. ते व्यावसायिक होत असतानाच सामान्य माणसाच्या डोक्यावरचा वर्गणीचा भार कमी झाला आहे. एखाद्या कॉलनीतल्या गणपतीचा मर्यादितच सोहळा असेल तर त्याला थोडीफार वर्गणी द्यावी लागते तेवढाच काय तो त्याला उपद्रव आहे. बहुसंख्य गणेशोत्सव मंडळांंचे पैसे उभारण्याचे मार्ग बदलले आहेत. त्यांनी चक्क आमदार, खासदार आणि नगरसेवकांना गाठायला सुरूवात केली आहे. या लोकांना गाठून एकच लाखाचा आकडा टाकला की, दारोदार फिरून पैसे गोळा करण्याची काही गरजच रहात नाही. शिवाय हाही आकडा एवढा मोठा असतो की त्यात पुन्हा दारोदार फिरून मिळू शकणारा आकडा अगदी नगण्य असतो.

ही नेते मंडळीही नाहीतरी निवडणुकीत पैसे वाटतच असतात. तेव्हा त्या वेळी आचारसंहिता मोडून मतांसाठी पैसे घेण्यापेक्षा तेच पैसे वेगळ्या स्वरूपात आणि पाच हप्त्याने घेतलेले आणि दिलेलेही काय वाईट ? असा सूज्ञ विचार मंडळांनी आणि नेत्यांनीही केला आहे. गणेशोत्सवातून लोक शहाणे होतात असे लोकमान्य टिळकांचे म्हणणे होते. त्याचा प्रत्यय वर्गणीची नवी युक्ती पाहून निदान आता तरी का होईना येत आहे. लहान वयात आपले एक गणेशोत्सव मंडळ काढणे, त्यासाठी बैठक घेणे आणि वर्गणी गोळा करून समारंभ साजरा करणे यातून लोकशाहीसाठी आवश्यक असा कार्यकर्ता आकाराला येत असतो असे टिळकांना वाटत होते. पण आता राजकारणात असा कार्यकर्ता तयार होण्याचे दिवस मागे पडले आहेत. आता लोकशाहीतला खरा आदर्श कार्यकर्ता तोच असतो जो नेत्यांशी मतपेढीच्या भाषेत बोलतो आणि योग्य त्या पद्धतीने सौदेबाजी करतो. या सौदेबाजीत जो नेत्याला जास्तीत जास्त वाकवतो आणि त्याच्या बदल्यात जास्तीत जास्त वर्गणी खेचून आणतो तोच खरा निष्णात कार्यकर्ता असे समजले जायला लागले आहे.

काही दिवसांपूर्वी मंडळांना हा शोध लागला तेव्हा नेत्यांनाही ही पद्धत बरी वाटली. सामान्य माणसातून काही वर्गणी जमा केली जायची, व्यापार्‍यांकडे जरा जास्त आकडे पडायचे अशा स्थितीत नेत्यांनी थोडा जास्त आकडा टाकला की त्याचेही वजन रहायचे आणि मंडळांनाही एकुणात मोठी रक्कम मिळायची. पण आता नेत्यांचीच कमाई वाढली आहे. त्यांच्या निवडणुकांचे बजेटही लाखांवरून कोटींवर आणि कोटींवरून अब्जावर गेले आहे. त्यामुळे त्यातले काही लाख रुपये त्यांनी मंडळांना दिले तर त्याना काही ओझे होणार नाही. शेवटी त्यांनाही लोकप्रियता हवीच असते. नेते असे पावायला लागल्याने उत्सवही शानदार होत आहेत. त्यांना अजून एक नवा मार्ग सापडला आहे. तो म्हणजे प्रायोजकांचा. काही कंपन्यांनाही आता गणेशोत्सव आपल्या जाहीरातीला अनुकूल असा दिसायला लागला आहे. जिथे गर्दी असते तिथे जाहीरात ही केली जाते. गणेशोत्सवात तर लाखोंनी लोक घराबाहेर पडतात. जे थोडा वेळ घरात आणि अधिक वेळ बाहेर असतात ते आता अधिक वेळ मंडपात दिसायला लागतात. अशा वेळी मार्केटिंग तज्ञांच्या विक्री कौशल्याला ही गर्दी खुणवायला लागते आणि या गर्दीवर आपला बॅर्रंड ठसवायला ते सरसावतात. अशा वेळी त्यांना हजाराच्या आणि लाखाच्या रकमांचे काही अवघड वाटत नाही. पण मंडळांना एक मोठा स्रोत सापडतो.

आपण गणेशोत्सवाला कोठून कोठे आणले आहे हे पाहून आश्‍चर्य वाटल्याशिवाय रहात नाही. वर्गणीची अशी कोटीच्या कोटी उड्डाणे सुरू झाल्यावर देखावे आणि आरास यांचा थाट काय पहावा ? तो थाट पाहणे हीही एक पर्वणीच. मग तिच्यासाठी थोडे शुल्क लागले तर कोणालाही वाईट वाटायचे काही कारण नाही. उलट असा सशुल्क देखावा आहे म्हणजे तो काही तर खासच असणार असे मानून लोक पैसे देऊन तिथे रांंगा लावतात. त्यातून मंडळाच्या वैभवात भरच पडत जाते. मग बाप्पांचे दागिने, त्यांची सजावट आणि राजेशाही मंडप यांचा एक व्यापच होऊन जातो. उत्पन्नाचा आणखी एक मार्ग आहे तो पूजेचा. रोज सकाळी आणि संध्याकाळी कोणातरी पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक पूजा केली जाते.

जो भक्कम वर्गणी देईल तो पूजेचा मानकरी होतो. असे निदान २० तरी भक्कम मानकरी सापडतात आणि संपत्तीत भर पडते. एकुणात काय तर सामान्य माणसाची वर्गणीतून सुटका होते आणि असामान्य लोक हेच गणेशोत्सवाचे आधारस्तंभ होतात. सामान्य माणसाला हा दिलासा वाटत असला तरीही या असामान्य आणि मोठ्या लोकांनी हा पैसा सामान्य माणसाच्याच खिशातून नकळतपणे आणि अप्रत्यक्षपणे अलगदपणे काढलेला असतो. हे या सामान्य माणसाला कळत नाही. तो अज्ञानात आनंदी असतो. या सार्‍या बदलात लोकमान्य टिळकांनी हा उत्सव कशासाठी सुरू केला याचे मात्र सर्वांना विस्मरण होत आहे. पारतंत्र्याच्या अंध:कारात जनतेच्या मनात स्वत्वाची भावना जागी करून त्यांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करणे हा त्यांचा हेतू होता. पण त्याही काळात त्यांनी ‘व्याख्यानमालांसारखे उपक्रम फार थोडया लोकांना मानवतात,’ असे म्हटले होते. ही गोष्ट खरी असली तरी अजूनही असे लोक ‘थोडेच’ असावेत आणि त्यांची संख्या वाढू नये हे किती दु:खाचे आहे?

Leave a Comment