महिलांच्या क्रिकेट खेळण्यावर बंदी आणणाऱ्या अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचा दणका


सिडनी – तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता अफगानिस्तानच्या क्रिकेट क्षेत्रावर संकट आले आहे. नोव्हेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध खेळला जाणारा एकमेव कसोटी सामना रद्द करण्याचे संकेत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले आहेत. याबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे म्हणणे आहे की, तालिबान जर अफगानिस्तानमधील महिला क्रिकेटवर बंदी आणणार असेल, तर ते नोव्हेंबरमधील हा कसोटी सामना रद्द करतील.

अफगाणिस्तान महिला क्रिकेट टीमच्या भविष्याविषयी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने चिंता व्यक्त केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून असे सांगण्यात आले आहे की, तालिबान सरकारकडून जर महिलांना क्रिकेट खेळू दिले जाणार नाही, हे खरे असेल तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानमधील कसोटी सामना रद्द केला जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे म्हटलं आहे की, ते महिलांच्या क्रिकेटला देखील पुरुषांच्या क्रिकेट एवढेच महत्व देतात. त्यामुळे जर अफगाणिस्तानमधील महिला क्रिकेट खेळणार नसतील, तर अफगाणिस्तानच्या पुरुष संघालाही खेळू दिले जाणार नाही.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुढे असे म्हटले आहे की, राशिद खान सारख्या खेळाडूंना आम्ही ऑस्ट्रेलियात कसोटी सामना खेळताना पाहू इच्छितो. पण हे तेव्हाच शक्य होईल, जेव्हा रोया समीम आणि त्यांची टीम देखील क्रिकेट खेळेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयाचे ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनने देखील स्वागत केले आहे. अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 27 नोव्हेंबरला होबार्टमध्ये एकमेव कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तालिबानने जर अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट संघाला बॅन केले, तर अफगाणिस्तानला आयसीसीच्या नियमित सदस्यत्वाचा दर्जा देखील गमवावा लागेल. आयसीसी त्याच देशांना नियमित सदस्यत्व देते, ज्या देशाचे महिला क्रिकेट संघ देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतात.