भारतीय संघातील सदस्य कोरोनाबाधित आढळल्यानंतर पाचव्या कसोटीवर प्रश्नचिन्ह


लंडन – भारताने इंग्लंड विरुद्धच्या पाच कसोटी सामन्याच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या मालिकेतील चार सामने आतापर्यंत झाले आहेत. पावसामुळे पहिला सामना अनिर्णित ठरला, दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवत बरोबरी साधली. चौथ्या कसोटी सामन्यात भारताने जोरदार कमबॅक करत इंग्लंडला पराभूत केलं आणि मालिकेत २-१ आघाडी घेतली.

पाचवा कसोटी सामना इंग्लंडसाठी महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकून बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे. तर पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची भारताला संधी आहे. असे असताना आता पाचव्या कसोटी सामन्यावर टांगती तलवार आहे.

भारतीय संघातील सदस्य कोरोनाबाधित आढळल्यानंतर पाचव्या कसोटीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री, भारत अरूण आणि आर. श्रीधर यांना कोरोनाची लागण झाली आहे. लंडनमधील एका हॉटेलमध्ये या तिघांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. चौथ्या कसोटीला या तिघांना मुकावे लागले होते.

भारतीय संघातील खेळाडू चौथ्या कसोटी सामन्यावेळी सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. त्यामुळे कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चौथ्या कसोटीवेळी बहुतेक खेळाडू सपोर्ट स्टाफच्या संपर्कात आले होते. गेल्या आठवड्यात सपोर्ट स्टाफची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती.

आयपीएल १९ सप्टेंबरपासून सुरु होणार असल्यामुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. खेळाडूंना जर कोरोनाची लागण झाली, तर आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाचवा कसोटी सामना रद्द करण्याच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान पाचवा कसोटी सामन्यापूर्वीचा संघ सराव रद्द करण्यात आला आहे. खेळाडूंना रुममधून बाहेर पडू नका, असे आदेश देण्यात आले आहेत.