पत्रकार संघटनेने उच्च ध्येय्य समोर ठेवून काम करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी


मुंबई : पत्रकारांच्या व्यापक हितासाठी काम करताना पत्रकार संघटनांनी उच्च ध्येय्य समोर ठेवून मिशनरी स्पिरीटने काम करावे. पत्रकारांच्या समस्या शासनाकडे नेताना त्यांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि सादरीकरण केल्यास त्यांची दखल घेणे भाग पडेल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांनी स्थापन केलेल्या ‘व्हॉईस ऑफ मिडिया’ या राष्ट्रव्यापी संघटनेच्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, कोरोना काळात राज्यात अनेक पत्रकारांचे निधन झाले. मात्र नेमक्या किती पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला याबाबत अचूक माहिती एकत्रितपणे उपलब्ध असणे गरजेचे आहे. पत्रकार संघटनांनी पत्रकारांविषयी सर्व माहितीची योग्य नोंद घेऊन मृत पत्रकारांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी लढले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. पत्रकारितेत तंत्रज्ञानामुळे बदल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार संघटनांनी पत्रकारांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य वर्धनासाठी काम करावे, अशी सूचनाही कोश्यारी यांनी यावेळी केली.

‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी पत्रकार संघटना पत्रकारांचे आरोग्य, निवृत्त पत्रकारांना मदत, पत्रकारांचे प्रशिक्षण यांसाठी काम करणार असून आजवर १८ राज्यात संघटनेचे काम सुरु झाले असल्याचे सांगितले.

नवाकाळच्या संपादिका जयश्री खाडिलकर पांडे, जय महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे सीईओ चंद्रमोहन पुप्पाला, साम टीव्हीचे संपादक प्रसन्न जोशी, संपादक आशुतोष पाटील, सोराचे संपादक नरेंद्र बोर्लेपवार, संपादक तुळशीदास भोईटे, प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे, संपादक संतोष आंधळे, राजेंद्र थोरात आदी उपस्थित होते.