भारतातील आपला गाशा गुंडाळण्याचा फोर्ड कंपनीचा निर्णय !


नवी दिल्ली – भारतातील आपला गाशा अमेरिकेची वाहन बनवणारी प्रमुख कंपनी फोर्ड मोटर गुंडाळणार असल्याची माहिती समोर येत आहे. कंपनीने देशात सुरु असलेले दोन्ही कारखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसात भारतात फोर्ड वाहनांच्या विक्रीत घट झाली आहे. त्याचबरोबर कंपनीने वाहनांचे नवं मॉडेलदेखील लॉन्च न केल्यामुळे दोन्ही कारखाने तोट्यात असल्याचे कारण सूत्रांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलं आहे. जवळपास एका वर्षाचा अवधी कारखाने बंद करण्यासाठी लागेल, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. जनरल मोटर्स आणि हार्ले डेव्हिडसननंतर फोर्ड ही तिसरी अमेरिकन कंपनी भारतातील आपली निर्मिती बंद करणार आहे.

साणंद आणि मराईमलाई येथे कंपनीचे कारखाने आहेत. दरम्यान देशातील कारखाने बंद केल्यानंतरही कंपनी आयतीद्वारे देशात गाड्या विकत राहील, अशीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ग्राहकांना सेवा देण्यासाठी डीलर्संना मदत होणार आहे. कंपनीला गेल्या १० वर्षात २ अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. तर २०१९ मध्ये नॉन आपरेटिंगमुळे ०.८ अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते.

कंपनीने गेल्या ऑगस्टमध्ये देशभरात एकूण १,५०८ वाहनांची विक्री केली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात ४,७३१ वाहनांची विक्री केल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विक्रीत ६८.१ टक्क्यांची घट दिसून येत आहे. याशिवाय पॅसेंजर कार सेगमेंटमध्ये कंपनीचा मार्केट शेअरदेखील ०.६ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये २ टक्के एवढा होता. सध्या फोर्ड कंपनी भारतीय बाजारात फोगो हॅचबॅक, एस्पायर सेडान गाड्यांसह एसयूव्ही सेगमेंटमध्ये इकोस्पोर्ट, एन्डेव्हर आणि फ्रीस्टाइल मॉडेलची विक्री करत आहे. एन्डेव्हर भारतीय बाजारात चांगली मागणी आहे. गेल्या महिन्यात कंपनीने ९२८ एन्डेव्हर गाड्यांची विक्री केली. तर फोर्ड फिगो या गाड्यांच्या मागणीत घट झाली आहे. गेल्या महिन्यात फक्त ७ गाड्या विकल्या गेल्या आहेत.