दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील ग्रामस्थांचे हक्क अबाधित राहतील याची काळजी घ्या – दत्तात्रय भरणे


मुंबई : दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातील 14 गावातील ग्रामस्थांना त्यांच्या दैनंदिन गरजा, शेती आदींसाठी अडथळे येणार नाहीत, त्यांचे हक्क अबाधित राहतील यादृष्टीने वनविभागाने काळजी घ्यावी, असे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयात भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या अनुषंगाने झालेल्या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासह वनविभागाचे उपसचिव गजेंद्र नरवने उपस्थित होते. दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक समाधान चव्हाण आदी उपस्थित होते.

दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रात 14 पैकी 3 गावांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. या गावातील गावकऱ्यांचे हक्क अबाधित रहावेत; त्यांच्या दैनंदिन कामाला अडथळे येऊ नयेत यासाठी विधि व न्याय विभागाचे अभिप्राय घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश भरणे यांनी दिले.

अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाची रक्कम देणे अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्याबाबत तातडीने पावले उचलावित अशी मागणी आबीटकर यांनी केली. त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश भरणे यांनी दिले. दाजीपूर अभयारण्याच्या क्षेत्रातून 14 गावे वगळण्याच्या अनुषंगानेही आबीटकर यांनी मागणी केली.