आयसीसी क्रमवारीत मुंबईकर शार्दूल ठाकूरची फलंदाजी आणि गोलंदाजीत मोठी झेप


नवी दिल्ली – ICC अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच संपलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर जागतिक कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यामध्ये रँकिंगमध्ये सर्वाधिक सुधारणा झालेला भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर ठरला आहे. ओव्हलवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये मुंबईकर शार्दूल ठाकूरने चमकदार कामगिरी केली. फलंदाजी आणि गोलंदाजीत शार्दूलने केलेल्या याच कामगिरीच्या जोरावर त्याने कसोटी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. शार्दूलसोबतच इंग्लंडचा फलंदाज ओली पोप याने देखील क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत शार्दूल ठाकूरने १३८व्या स्थानावरून फलंदाजीमध्ये थेट ७९व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. शार्दूल ठाकूरने ओव्हलच्या कसोटीच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतक झळकावून महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचाच परिणाम म्हणून त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये सुधारणा झाली आहे.


दुसरीकडे शार्दूल ठाकूरने गोलंदाजीमध्ये देखील ५६ वरून ४९व्या स्थानी झेप घेतली आहे. शार्दूलने ओव्हल कसोटीमध्ये पहिल्या डावात एक तर दुसऱ्या डावात दोन बळी घेतले होते. दोन्ही डावांमध्ये मिळून शार्दूलने २३ षटकांमध्ये फक्त ७६ धावा दिल्या होत्या.

एकीकडे शार्दूल ठाकूरने क्रमवारीत घसघशीत वाढ केली असताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने सामनावीराची खेळी करताना केलेल्या १२७ धावांच्या जोरावर आपले पाचवे स्थान कायम राखले आहे. तर अजूनही सातव्या स्थानावर कर्णधार विराट कोहली कायम आहे. त्यासोबत भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याने एका स्थानाची कमाई करत १०व्या स्थानावरून ९व्या स्थानावर झेप घेतली आहे. ओव्हल कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहने दोन्ही डावांमध्ये प्रत्येकी २ बळी घेतले होते.