कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या वक्तव्यावर महापौर किशोरी पेडणेकरांचे स्पष्टीकरण


मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव लक्षात घेता, आगामी सण- उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आली, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचे काल विविध समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते.

महापौरांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मुंबईच्या उंबरठ्यावर तिसरी लाट ही आली असून दोन्ही लाटांचा अनुभव लक्षात घेता, आपण योग्य ती खबरदारी तसेच नियमांचे पालन करून ही लाट थोपविण्याचा प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. केरळमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक असल्याचे महापौर म्हणाल्या.

महापौरांनी पुढे सांगितलं की, आगामी गणेशोत्सव लक्षात घेता, सुज्ञ मुंबईकर “माझे घर,माझा बाप्पा” यानुसार आपल्या गणपतीचे घरीच पूजन करणार. गणपतीला मी इतरांकडे जाणार नाही व कोणाला माझ्याकडे येऊ देणार नाही. तसेच प्रत्येक मंडळाने “माझे मंडळ, माझा गणपती” याप्रमाणे मी इतर मंडळांमध्ये जाणार नाही व इतरांना माझ्या मंडळामध्ये येऊ देणार नाही, यानुसार आपण वागलो, तर गर्दी कमी करण्यात हातभार लावू शकू. सद्यस्थितीमध्ये मास्क वापरणे, वारंवार हात धुणे तसेच सामाजिक अंतर पाळणे या त्रिसूत्रीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तरच आपण कोरोनावर नियंत्रण मिळू शकतो, असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच योग्य तो निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. केरळमध्ये ओणमच्या सणानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे, एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे, गर्दी करून नियम नाही पाळले, तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले असल्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल, तरच तिसरी लाट रोखता येईल, असेही महापौरांनी स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे, त्यामुळे येथील मंडळांनी, गणेश भक्तांनी शिस्तबद्धपणे कोरोना नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.