नवी दिल्ली – देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 31 हजार 222 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काल दिवसभरात 31 हजार 222 कोरोनाबाधितांची नोंद, तर 290 रुग्णांचा मृत्यू
आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 42 हजार 942 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशभरातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढून तीन कोटी 22 लाख 24 हजार 937 झाली आहे. तर सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाख 92 हजार 864 एवढी आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 3 कोटी 30 लाख 58 हजार 843 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ज्यापैकी आतापर्यंत 4 लाख 41 हजार 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात काल दिवसभरात 3, 626 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 09 टक्के आहे. तर काल राज्यात 37 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा डेथ रेट मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 47 हजार 695 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,413 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.