अन् तिचे ‘तारक मेहता…’मध्ये झाले पुनरागमन


गेल्या १३ वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांची मोठी पसंती या शोमधील सर्वच कलाकारांनी मिळवली आहे. या शोमधील प्रत्येक पात्र हे खास असून त्यांची एक वेगळी ओळख आहे. यातच आता या शोमधील अनेकांचे फेव्हरेट व्यक्तिमत्व एक खास पात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘तारक मेहता…’मधील अनेकांच्या आवडत्या अशा एका अभिनेत्रीने या शोमधून गेल्या काही दिवसांपासून ब्रेक घेतला होता. पण ही अभिनेत्री आता मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कदाचित अनेकांच्या डोक्यात दयाबेनचे नाव आले असेल. पण पुनरागमन करणारी ही अभिनेत्री दयाबेन नसून रीटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा आहे. प्रिया आहूजा पुन्हा एकदा ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये एण्ट्री करत आहे.


‘तारक मेहता…’मधील रीटा रिपोर्टर हे पात्र चांगलेच लोकप्रिय ठरले होत. पण अभिनेत्री प्रिया आहुजाने २०१९ सालामध्ये आई झाल्यामुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता. पण आता ती शोमध्ये पुन्हा आली आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोचे प्रियाचे पती मालव राजदा दिग्दर्शक आहेत. प्रिया पती मालव राजदासोबत अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोशल मीडिया ती सक्रिय असून अनेक मातांसाठी टीप्स शेअर करत असते.