रोहित पवारांनी ट्रॅक्टर चालवत घेतली शेतकऱ्यांची बांधावर भेट


जामखेड – नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार चर्चेत असतात. तसेच ते सतत आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असतात. जनमाणसांत मिसळून काम करत असल्यामुळे पवार सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेत. रोहित पवारांचा ट्रॅक्टर चालवत असतानाचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. रोहित पवारांनी स्वतः ट्रॅक्टर चालवत काही शेतकऱ्यांची भेट घेतल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.

आमदार रोहित पवार जामखेड तालुक्यातील नायगाव येथे तलावाचे जल पूजन करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली. ही पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार स्वतः ट्रॅक्टर चालवत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहोचले. पाणी साचलेल्या कच्च्या आणि खड्डे पडलेल्या रस्त्यांवरून ट्रॅक्टर चालवत जात त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत असलेले अधिकारी, पदाधिकारी आणि स्थानिक ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत बसून त्यांच्यासोबत गेले.