तामिळनाडूला शाळा उघडणे पडले महागात; ३० विद्यार्थी आणि शिक्षक कोरोनाबाधित


चेन्नई – जवळपास एका वर्षानंतर १ सप्टेंबरपासून तामिळनाडूमधील १० आणि १२वीच्या शाळा उघडण्यात आल्या. तर, इयत्ता ९ वी ते ११ वी साठी २ सप्टेंबरपासून शाळा पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. या एका आठवड्यात २० विद्यार्थी आणि १० शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक बाधित हे चेन्नईच्या एका खासगी शाळेतील आहेत. अलिकडेच बंगळुरूमधून परतलेल्या एका मुलासह त्याचे आई-वडील देखील कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर शाळेतील इतर १२० विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.

केरळचे आरोग्य मंत्री सुब्रमण्यम म्हणाले, कोणत्याही शाळेत जर विद्यार्थी किंवा शिक्षक कोरोनाबाधित आढळले, तर ती शाळा, संस्था ताबडतोब सील केली जाईल. तसेच सरकारच्या नियमवलीप्रमाणे आणि निर्जंतुकीकरण आणि इतर गोष्टी केल्या जातील. कोरोनाची लागण झालेल्यांना त्वरित वैद्यकीय मदत दिली जाईल. तसेच राज्यभरातील शाळांमध्ये टप्याटप्याने कोरोना चाचण्या घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

राज्यभरातून अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाईन वर्ग सुरू करण्याची मागणी केल्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याची योजना राज्य सरकारने आणली. शाळांमध्ये खबरदारीसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या. तसेच शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचं पूर्णपणे लसीकरण झाले की नाही, याची खात्री करण्यात आल्याची माहिती इंडिया टूडेने दिली आहे.