फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये


मुंबई – मंगळवारी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचे लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी डोबिंवली पूर्व पश्चिमला जोडणारा कोपर उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. हा जुना पूल गेली दोन वर्षे बंद होता. नंतर तोडून नव्याने बांधण्यात आला. हा पूल नसल्यामुळे पूर्व पश्चिम प्रवास करायला ठाकुर्लीच्या उड्डाणपुलावरून वळसा घालायला लागयचा. हा वेळ आता या पुलामुळे वाचणार आहे. १ वर्षे आणि ४ महिन्यात हा पूल पूर्ण झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली. या कार्यक्रमावेळी शिवसेना भाजप नेत्यांचा कलगीतुरा पाहायला मिळाला. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकमेकांना कानपिचक्या दिल्या. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे , खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार रविंद्र फाटक, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेरीवाल्यांचा मुद्दा अधोरेखित केला आणि येत्या काळात कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

जी काही घटना मधल्या काळात ठाण्यामध्ये घडली, त्यामुळे येत्या काळात आपल्याला कठोरपणे कायदा राबवावा लागेल. तिथे दया, माया, क्षमा दाखवता येणार नाही. नागरिक, माता भगिनी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा आपल्यावर आहे. त्याबाबतीत कुठेही हयगय चालणार नाही. स्कायवॉकच नव्हे, तर इतर ठिकाणी जर फेरीवाल्यांचा उच्छाद असेल. तो उच्छाद आपल्याला आटोक्यात आणावाच लागेल. आपल्याला त्या दिशेने काम करावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.