चांदीवाल आयोगाचे परमबीर सिंहांविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी


मुंबई – चांदीवाल आयोगाने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध वसुलीच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आयोगासमोर परमबीर सिंह उपस्थित राहत नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले जावे, असे आयोगाचे वकील शिशिर हिरे यांनी म्हटले होते. यावर मंगळवारी ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट आयोगाने जारी केले आहे.

महाराष्ट्र सरकारने मार्चमध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली होती. सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देशमुख यांच्यावर मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना रेस्टॉरंट आणि बार मालकांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता.

हे वॉरंट जारी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश आयोगाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना दिले. या अगोदर परमबीर यांना आयोगासमोर गैरहजर राहिल्याबद्दल आयोगाने तीनदा दंड ठोठावला आहे. तिसऱ्या अनुपस्थितीनंतर, परमबीर सिंग यांना २५,००० रुपये दंड करण्यात आला, जो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कोविड १९ च्या निधीमध्ये जमा करण्यास सांगितले गेले आणि आता चौथ्यांदा अनुपस्थितीनंतर ५०,००० रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले.

याआधी परमबीर सिंह यांच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी करण्यात आली आहे. आता परमबीर सिंहाच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. गेल्या सुनावणीमध्ये आयोगासमोर हजर न राहिल्यास वॉरंट काढण्याचे आदेश देण्यात आले होते.