मध्य मुंबई चिंतेत; गेल्या आठवड्याभरापासून उत्सवनगरीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ


मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या मध्य मुंबईत कोरोनाबाधितांच्या वाढीचा आलेख वाढताना दिसत आहे. रुग्णवाढीत सगळ्यात वरच्या स्थानावर परळ, लालबाग, शिवडी, नायगाव, वडाळा हे परिसर आहेत. गणेशोत्सवात गजबजणाऱ्या या भागात उत्सवापूर्वीच रुग्णवाढीचे विघ्न येऊन ठेपले आहे. मध्य मुंबईपाठोपाठ भायखळ्यातही कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

एकीकडे मुंबईतील बाजारपेठा गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गर्दीने ओसंडून वाहत आहेत, तर दुसरीकडे पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. शहरात निर्बंध शिथिल केल्यानंतर २० दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्येने जवळपास पाचशेचा आकडा पुन्हा गाठला आहे. रविवारी मुंबईत ४९६ रुग्णांचे नव्याने निदान झाले. १२ जुलैनंतर प्रथमच मुंबईत एवढ्या मोठया संख्येने रुग्णसंख्या वाढल्याचे आढळले आहे.

नागरिकांनी जो संयम गेल्या वर्षी गणेशोत्सवात दाखवला, तो यावर्षी दिसत नाही. लालबाग, परळ हा अस्सल मराठी लोकवस्तीचा भाग एरवीही गजबजलेला असतो. पण प्रत्यक्षात या भागात गणेशोत्सव सुरू होण्याआधीच कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र आहे. अन्य मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत येथे रुग्णवाढीचा दर जास्त आहे.

गेल्या आठवड्यापासून रुग्णवाढीत पहिल्या क्रमांकावर भायखळ्याचा समावेश असलेला ई विभाग हा आहे. गेल्या आठवड्यापासून या भागात दररोज पंधरा ते वीस नव्या रुग्णांची भर पडत आहे. गेल्याच आठवड्यात एकाच दिवसात २२ रुग्ण या भागातील एका अनाथाश्रमात आढळल्यामुळे हा दर वाढल्याचे मत सहाय्यक आयुक्त मनीष वळंजू यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर या भागात जे जे रुग्णालय असून तेथील कर्मचारी, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी बाधित झाले की त्याची नोंद होत असल्यामुळे ही रुग्णवाढ दिसत असल्याचेही ते म्हणाले.

तसेच या भागात फळांची व भाज्यांची व विविध वस्तूंची मोठी बाजारपेठ असल्यामुळे खरेदीला येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळेही रुग्ण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. पण आम्ही चाचण्यांची संख्या वाढवली असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील बाधितांचे प्रमाण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ०.८६ टक्के होते. तर ३११२ रुग्ण उपचार घेत होते. परंतु सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पुन्हा रुग्णसंख्येने उसळी घेतली आहे. बाधितांचे प्रमाण १.२१ टक्के झाले आहे. मुंबईत दहा दिवसांतच ३,८४३ रुग्णवाढ झाली.

जरी कोरोनाबाधितांची वाढली असली, तरी मुंबईतील चाळी अजूनही कोरोनामुक्तच आहेत. कोरोना संक्रमण गृह संकुलांमध्येच वाढत असून सध्या मुंबईत ४४ इमारती प्रतिबंधित आहेत. कोरोनाचे प्रमाण मुंबईतील चाळींमध्ये वाढल्यास विलगीकरणाची सुविधा उपलब्ध असावी यादृष्टीने सुमारे २५ हजारांची क्षमता असलेले कोविड केअर सेंटर तयार करण्याच्या सूचना विभागांना देण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना तातडीने येथे विलगीकरणासाठी पाठविता येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

आता १४ दिवस निर्बंध शिथिल करून उलटून गेल्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या किचिंत वाढली आहे. पण आता पुढील एक महिना तरी कसोटीचा काळ असेल. गणेशोत्सवानंतर कोरोनाबाधितांची संख्या वेगाने न वाढल्यास मुंबईत संक्रमण पुन्हा वाढणार नाही, असे म्हणता येईल, असे मत काकाणी यांनी व्यक्त केले.