महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम.फील पदव्युत्तर पदवी सुरु करण्यास मान्यता


मुंबई : पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील (क्लिनिकल सायकॉलॉजी) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत मान्यता देण्यात आली आहे.

भारतीय पुनर्वास परिषद यांनी दिलेल्या परवानगी विचारात घेऊन पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालय परिसर येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेस एम. फील (क्लिनिकल सायकॉलॉजी) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून 4 प्रवेश क्षमतेसह हा अभ्यासक्रम सुरु करण्यास अटी व शर्तीच्या अधीन राहून मान्यता देण्यात आली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालय, केंद्र शासन, मा. उच्च न्यायालय आणि राज्य शासन यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरिता निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धती अवलंबिण्यात येणे आवश्यक आहे. राज्य शासन, भारतीय पुनर्वास परिषद तसेच विद्यापीठाने एफ.फील (क्लिनिकल सायकॉलॉजी) या अभ्यासक्रमाबाबत वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे व मानकांचे पालन करणे संस्थेवर बंधनकारक राहील. संस्थेने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून संलग्नता प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशित करणे अनिवार्य असेल.