अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी लवकरच होणार या नावाची अधिकृत घोषणा


काबूल – अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवण्याच्या प्रयत्नामध्ये असणाऱ्या तालिबानने आपल्या सर्वोच्च नेत्याचे नाव जवळजवळ निश्चित केले असून देशाचा सर्वोच्च नेता म्हणजेच अफगाणिस्तानच्या पंतप्रधान पदी मुल्ला मोहम्मद हसन अखुंड यांना बसवले जाणार आहे. तसेच दोन उपपंतप्रधानही नियुक्त करण्यात येणार असून या पदांवर मुल्ला बरादर आणि मुल्ला अब्दुस सलाम यांची वर्णी लागणार आहे. सीएनएन-न्यूज १८ ला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी मोहम्मद हसन अखुंड यांचे नाव मुल्ला अखुंडजादाने सुचवले आहे. त्याचप्रमाणे जागतिक स्तरावरील प्रसारमाध्यमांना अफगाणिस्तानमधील प्रत्येक माहिती देणारा जबीउल्लाह मुजाहिदीन हा अखुंड यांचा अधिकृत प्रवक्ता म्हणून काम करणार आहे.

अफगाणिस्तानच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी सिराज जुद्दीन हक्कानीकडे देण्यात येणार आहे. सर्व राज्यपालांची नावे हक्कानीच निश्चित करणार आहे. पाकिस्तानी गुप्तचर संघटना असणाऱ्या आयएसआयचे प्रमुख हामिद फैज यांनी केलेल्या काबूल दौऱ्यामध्येच सरकारच्या बांधणीसंदर्भात सुरुवातीचे काम झाल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारची मोट बांधण्यासाठी हक्कानीला फैज यांनी मदत केल्याचे सांगण्यात येते. तालिबान आणि अफगाणिस्तान लष्करामधील संघर्षामध्ये लष्कराचे फार नुकसान झाले. हक्कानी नेटवर्कला आयएसआयने सुरक्षा पुरवल्याचे सांगितले जाते. हक्कानी हा अलकायदाशी संबंध असणारा गट आहे. संयुक्त राष्ट्रांबरोबरच अमेरिकेनेही हक्कानी गटाला दहशतवादी गट म्हणून जाहीर केले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुल्ला अमीर खान मुत्ताकींकडे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नेतृत्व सोपवण्यात येणार आहे. सध्या कार्यवाहक पद्धतीचे हे सरकार असणार आहे. तालिबानच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारची पुढील २४ तासांमध्ये घोषणा केली जाईल. पंजशीरवरही तालिबानने ताबा मिळवल्याचा दावा केला जात आहे. अफगाणिस्तानचे माजी उपाध्यक्ष अमरुल्ला सालेह आणि तालिबानविरोधक अहमद शहा मसूद यांचे पुत्र अहमद मसूद तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व करीत होते. या दोघांनाही तझाकिस्तानमध्ये पळ काढल्याचे सांगण्यात येते. एनआरएफच्या नेता असणाऱ्या मसूदने पंजशीरमध्ये अजूनही युद्ध सुरु असल्याचा दावा केला आहे.

द न्यूजच्या वृत्तानुसार रहबारी शूरा या गटाचे मुल्ला मोहम्मद हसन अखुंड हे प्रमुख आहेत. जे निर्णय तालिबान घेते त्यामागे असणाऱ्या परिषदेला रहबारी शूरा असे म्हटले जाते. त्याच परिषदेचे अखुंड हे प्रमुख नेते आहेत. अखुंड यांचा जन्म कंदहारमध्ये झाला असून नंतर ते तालिबानच्या सशस्त्र लढाईचे नेतृत्व करणाऱ्या गटाच्या सहसंस्थापकांपैकी एक होते. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांनी रविवारी काबूलमध्ये माजी पंतप्रधान गुलबुद्दीन हिमतयार यांची भेट घेतली.

अफगाणिस्तानमधील अफगाण न्यूज पोर्टलने दिलेलेया माहितीनुसार ही बैठक सरकार कसे बनवायचे यासंदर्भातील चर्चेसाठी घेण्यात आलेली. बरादर आणि तालिबानचा सर्वोच्च नेता हिबातुल्लाह अखुंदजादा यांच्याऐवजी अखुंड यांना प्रमुख नेता म्हणून जाहीर करण्याचा निर्णय याच बैठकीमध्ये घेण्यात आल्याचे समजते. अखुंड हे इतर नेत्यांपेक्षा कमी प्रभावशाली असल्यामुळे ते तालिबानच्या इशाऱ्यावर काम करतील, अशा अपेक्षेने ही निवड करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.