केरळात निपाह व्हायरसमुळे एका 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू


केरळ : देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र दिसत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रशासनाच्या वतीने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचेही आवाहन केले जात आहे. अशातच केरळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा दैनंदिन आकडेवारीपैकी सर्वाधिक दैनंदिन बाधितांची नोंद केरळात करण्यात येत आहे. त्यातच आता केरळात कोरोनापाठोपाठ निपाह व्हायरसचाही प्रादुर्भाव वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. केरळात निपाहच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यूही झाला आहे. केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मुलाला निपाह व्हायरसची लागण झाल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात निपाहमुळे केरळात झालेल्या 12 वर्षीय मुलाच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याच्यात काही लक्षणे दिसून आली होती. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी निपाह व्हायरसची लागण झाल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर केरळ सरकारने शनिवारी आरोग्य अधिकाऱ्यांची एक उच्चस्तरीय बैठक बोलावली होती.