जावेद अख्तर यांना पत्र लिहून नितेश राणेंनी केली हिंदूंची बिनशर्त माफी मागण्याची मागणी


मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दल यांना समर्थन देणाऱ्यांची मानसिकता तालिबानी असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यानंतर आता भाजप आक्रमक झाली असून जावेद अख्तर यांना पत्र लिहून हिंदूंची बिनशर्त माफी मागण्याची भाजप आमदार नितेश राणे यांनी मागणी केली आहे. त्याचबरोबर नितेश राणे यांनी जावेद अख्तर यांना चर्चेसाठी खुले आव्हानही दिले आहे.

जावेद अख्तर यांना लिहिलेल्या पत्रात नितेश राणे यांनी म्हटले आहे की, भारत भूमी ही आपली माता आहे. आजवर या भारतमातेने मुघल-अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह सहन केले आहेत. हिंदूधर्मावर, हिंदुसंस्कृतीवर आणि धर्मिकस्थळांवर वारंवार हल्ले करुन ते नष्ट करण्याचे प्रयत्न केले. तरी या भारतभूमीने विशाल ह्रदय दाखवत आक्रमणकाऱ्यांनाही समावून घेतले. त्यांच्या कलाकृतींचे, साहित्य संस्कृतीचे जतन व संवर्धनही केल्यामुळेच या देशात आज अनेक पंथ, धर्म, संस्कृती आणि भाषा वाढल्या आणि नांदल्या. विशेषत: उर्दू लेखनाच्या तुमच्या कौशल्याचे भारतवासीयांनी नेहमी कौतूकच केलेले आहे. धर्मविस्ताराच्या नावाखाली तलवारीच्या जोरावर एकाही हिंदू राजाने आजवर कुठल्याही देशावर आक्रमण केले नसल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणे पुढे आपल्या पत्रात म्हणतात, तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करणे, हा एक सुनियोजित षडयंत्राचा भाग वाटतो. कारण ही तुलना करताना तुम्ही तालिबानी प्रवक्त्यासारखी भूमिका घेत कुटनितीने त्यांची तुलना हिंदुत्वाशी करत आहात. खरंतर मला हेच समजत नाही की तुम्हाला हिंदूधर्माविषयी एवढा राग का आहे? कदाचित कम्युनिस्ट विचारधारा असणाऱ्या तुमच्या सासरवाडीचा तुमच्यावर चांगलाच प्रभाव पडलेला दिसत आहे.


हिंदूत्त्व मुळातच एक समतोल जीवनशैली असून येथे सर्वप्रकारच्या उपासना पद्धती व श्रद्धांना स्थान असल्यामुळेच सहिष्णूता आणि घर्मानिरपेक्षता येथील हिंदूचा स्थायी स्वभाव असल्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले की हिंदू ही एक जीवनपद्धती व शैली आहे आणि येथील संस्कृतीचा गाभा आहे.

या देशात जो ही व्यक्ती राहतो, या देशाला तो आपली मातृभूमी समजून प्रेम करत असेल, येथील संस्कृतीशी एकरूप झाला, असेल तो आमच्यासाठी हिंदू आहे, मग त्याचा धर्म व उपासना पद्धती कोणतीही असेल! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हीच समरसतेची विचारधारा व पद्धती आहे. ज्या उर्दू भाषेत आपण लोकप्रिय गीत लेखन करता, ती उर्दूभाषा आपल्या गीतांनी व कवितांनी मोठी केली आहे. तिला अधिक व्यापक बनवले आहे, यात फिराक गोरखपुरी अर्थात रघुपती सहाय, बृजमोहन कैफी, राजेंद्रसिंग बेदी, उपेंद्रनाथ अश्क अशा अनेक कवी व साहित्यिकांचे नावे घेता येतील, असे राणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

तुम्ही टीव्ही चॅनेलच्या चर्चेत म्हणालात की, तालिबानी ज्या अमानुष पद्धतीने स्त्रियांना वागवतात त्याच पद्धतीने हिंदूही आपल्या स्त्रियांना वागवतात. खरंतर आपल्या हिंदूधर्माविषयीच्या अज्ञानावर मला दया येते, खरंतर हिंदू स्त्रीशक्ती आदर आणि सन्मान आम्ही करतो व त्यांची देवींच्या स्वरूपात पूजा करून नतमस्तकही होतो. तुम्हाला महिलांच्या हक्कांविषयी किती आदर आहे? हे कळून चुकलेले आहेच, कारण तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात ‘ट्रिपल तलाक’ सारख्या वाईट परंपरेवर बोलण्याचे धाडस केले नाही. जी अमानुष परंपरा मुस्लीम स्त्रियांना करार केलेल्या गुलामासारखी वागणूक द्यायची आणि जी कुप्रथा स्त्रियांचा आत्मसन्मान पितृसत्तेच्या पायदळी तुडावयची.