मुख्यमंत्र्यांच्या राजकारण करत असल्याच्या टीकेला फडणवीसांचे प्रतिउत्तर


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझा डॉक्टर परिषदेत बोलताना राजकारण आपले होते, पण जीव मात्र जनतेचा जातो म्हणत नाराजी व्यक्त करत विरोधकांना खडे बोल सुनावले होते. त्याचबरोबर मंदिरे उघडण्याच्या आंदोलनांवरुन टीक करताना म्हटले होते की, राज्यात मंदिरे उघडा या मागणीसाठी अनेकांनी आंदोलने केली. तुम्ही आंदोलने करा, अवश्य करा. पण कोरोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचे आहे. असे व्हायला नको.

दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. समोरच्यांना बोलायच्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना, आपल्या पक्षातील लोकांना पहिले शिकवावे आणि मग आम्हाला सांगावे, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

सत्तेसाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी महाविकास आघाडी तयार झाली आहे. सरदार असल्यासारखा प्रत्येकजण वागत आहे. जितके लचके तोडता येतील तेवढे तोडत असून नाही तोडता आले, तर एकमेकांचे लचके तोडा अशी अवस्था असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, कोणाला त्यापासून वंचित ठेवण्याचे कारण नाही. जे काही त्या ठिकाणी घडले आहे, त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि मिळालेले पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ईडीने लूकआऊट नोटीस काढली असल्याची माहिती मला देखील माध्यमांकडूनच मिळाली. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्यामुळे कायद्याच्या दृष्टीने त्यांनी आता चौकशीला सामोरे जावे, तेच योग्य ठरेल, असा सल्ला यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांना दिला.