मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांविरोधात ईडीची लूकआऊट नोटीस जारी!


मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी केल्याचा दावा याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी केला आहे. आता लवकरच अनिल देशमुखांना अटक होऊ शकते, असा दावाही जयश्री पाटील यांनी केला आहे. पण अद्याप यांदर्भात कोणतीही अधिकृत माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही.

अनिल देशमुख यांची मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. ईडीने याप्रकरणी वारंवार अनिल देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. अनिल देशमुखांनी याप्रकरणी ईडीचे समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेत दाद मागितली होती. पण, न्यायमूर्ती रेवती डेरे यांनी देशमुख यांच्या याचिकेवर कोणतीही सुनावणी करण्यास नकार दिल्यामुळे दुसऱ्या खंडपीठासमोर अनिल देशमुखांच्या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे. अशातच आता अॅड. जयश्री पाटील यांनी ईडीने अनिल देशमुखांविरोधात लूक आऊट नोटीस जारी केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, आतापर्यंत ईडीने अनिल देशमुख यांना पाच वेळा समन्स बजावले आहे. पण ते एकदाही चौकशीसाठी ईडीसमोर हजर झाले नाहीत. अनिल देशमुखांनी कायद्यानुसार, उपलब्ध पर्यायांचा विचार करत असल्याचा दावा करत हजर राहण्यास नकार दिला होता. अनिल देशमुख यांना गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणातील ईडीच्या कारवाईपासून अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता.