काल दिवसभरात देशात 38,948 कोरोनाबाधितांची नोंद, तर 219 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढवलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच आता दिवसागणिक 40 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधितांची नोंद केली जात आहे. आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात 38,948 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 43,903 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून देशातील आतापर्यंत एकूण तीन कोटी 30 लाख 27 हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 40 हजार 752 बाधितांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, 3 कोटी 21 लाख 81 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 4 हजार 874 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 4,057 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 5 हजार 916 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत राज्यात 62 लाख 94 हजार 767 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 05 टक्के आहे. तर राज्यात काल 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 095 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,325 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.