म्हणून दिले जातात विविध रंगांचे पासपोर्ट


परदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांना अत्यंत आवश्यक असतो तो पासपोर्ट किंवा पारपत्र. व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पासपोर्ट हा एक महत्वाचा दस्त मानला जातो. भारतात तीन विविध रंगाचे पासपोर्ट नागरिकांना दिले जातात याची अनेकांना माहिती नसेल. निळा, पांढरा आणि लालमरून रंगाच्या या प्रत्येक पासपोर्टचे वेगळे महत्व आहे. ते काय हे येथे जाणून घेऊ.

निळ्या रंगाचा पासपोर्ट हा सर्वसामान्य भारतीय नागरिकांना दिला जाणारा पासपोर्ट आहे. आपण नुसता पासपोर्ट दाखविला तरी कस्टम किंवा इमिग्रेशन अधिकारी तसेच परदेशी संस्थाना परदेशी निघालेली ही व्यक्ती सर्वसामान्य नागरिक आहे कि सरकारी अधिकारी याची माहिती लगेच मिळते. या पासपोर्टच्या शेवटच्या पानावर वडिलांचे नाव, कायमचा पत्ता व अन्य महत्वाची माहिती असते.पांढऱ्या रंगाचा पासपोर्ट सरकारी संस्थातील, त्यातही ज्यांना वारंवार परदेशी जावे लागते त्यांना दिला जातो. या पासपोर्टधारक व्यक्तीला विमानतळावरील कस्टम, इमिग्रेशन विभाग वेगळी वागणूक देतात. त्यांना विमानात बोर्डिंग करताना फारश्या औपचारिक बाबींची पूर्तता करावी लागत नाही.

लाल किंवा मरुन रंगाचा पासपोर्ट भारतीय राजनीतिक, वरिष्ठ सरकारी अधिकारी यांना दिला जातो. हा उच्च गुणवत्तेचा पासपोर्ट असून त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागतो. या पासपोर्ट धारकांना परदेश प्रवासात अनेक सवलती मिळतात तसेच त्यांना व्हिसाची गरज नसते. विमानतळावर त्यांना चटकन क्लिअरन्स दिला जातो.

सरकारने मध्यंतरी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या पण कमी शिक्षण असलेल्या कामगारांसाठी भगव्या रंगाचा पासपोर्ट जारी करण्याबाबत विचार केला होता. मात्र विरोधकांनी त्याला आक्षेप घेतल्याने हा निर्णय तूर्त लांबणीवर टाकला गेला आहे.

Leave a Comment