तालिबानची प्रवृत्ती रानटी असून भारतातही आरएसएसचे समर्थन करणारे त्याच तालिबानी मानसिकतेचे – जावेद अख्तर


तालिबानची प्रवृत्ती रानटी असल्याचे सांगत प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी टीकेची झोड उडवली आहे. त्याचबरोबर देशातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस), विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाचे समर्थन करणाऱ्यांचीही मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शुक्रवारी एनडीटीव्हीला एक मुलाखत जावेद अख्तर यांनी दिली होती. त्यांनी त्यामध्ये संघ आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांची तुलना तालिबानशी केल्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

यावेळी जावेद अख्तर म्हणाले की, तालिबानी हे ज्या पद्धतीने मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, त्याच पद्धतीने आपल्याकडील काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आणि रानटी आहेत, पण संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत.

तालिबानचे भारतातील मुस्लिमांचा एक छोटासा गट समर्थन करत असल्याचेही जावेद अख्तर यांनी सांगितले. जावेद अख्तर पुढे म्हणाले की, तालिबान आणि त्यांच्या सारखे वागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक प्रकारचे साम्य आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर देशातील काही मुस्लिमांनीही त्याचे स्वागत केले आहे. चांगले जीवन, रोजगार, चांगले शिक्षण या गोष्टीच्या मागे भारतातील मुस्लिम तरुण हे लागले आहे. पण मुस्लिमांचा एक लहानसा गट असा आहे की जे स्त्री-पुरुष असा भेदभाव करतात आणि समाजाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात.

धर्मनिरपेक्ष विचारांची भारतातील बहुतांश लोकसंख्या आहे. ते सभ्य असून एकमेकांचा आदर करतात. त्यामुळे तालिबानी विचार त्यांना आकर्षित करु शकत नाहीत. म्हणूनच भारत आताही नाही आणि भविष्यातही कधी तालिबानी बनू शकणार नसल्याचा विश्वास जावेद अख्तर यांनी व्यक्त केला.