अनिल देशमुख प्रकरणाचा अहवाल लीक करण्यासाठी सीबीआय अधिकाऱ्याला वकिलाने दिला होता आयफोन


मुंबई – केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा यांना अटक केली आहे. सीबीआयने ही कारवाई देशमुख यांच्याविरोधातील गुन्ह्याचा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी केली. सीबीआयने देशमुख यांचे वकील आणि सीबीआयचेच पोलीस उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांच्याविरोधात मुंबईतील बार आणि हॉटेलांकडून हप्तेवसुलीच्या आरोपप्रकरणी तपासाचा एक अहवाल फोडल्याच्या संशयावरून बुधवारी गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर तपासाअंतर्गत अनिल देशमुख प्राथमिक चौकशी आणि भ्रष्टाचाराच्या खटल्याशी संबंधित माहिती आणि कागदपत्रे लीक करण्यासाठी सीबीआयचे उपनिरीक्षक अभिषेक तिवारीला आयफोन १२ प्रो लाच म्हणून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

उपनिरीक्षक अभिषेक तिवारी आणि वकील आनंद डागा यांना देशमुख यांच्याविरुद्धच्या तपासाबाबतचा अहवाल लीक केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. तपास अहवाल लीक करण्यासाठी अभिषेक तिवारीला देशमुख यांचे वकील आनंद डागा यांनी लाच दिली होती. आपल्या तक्रारीमध्ये सीबीआयने म्हटले आहे की, अनिल देशमुख यांच्याविरुद्धच्या प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात अभिषेक तिवारी पुण्यात गेले होते. वकील आनंद डागा यांनाही ते भेटले आणि माहिती देण्याच्या बदल्यात डागा यांनी त्यांना लाच म्हणून आयफोन दिल्याची माहिती मिळाली आहे.

डागा नियमितपणे अभिषेक तिवारीला लाच देत होते. तक्रारीत म्हटले आहे की तपास अधिकारी आर एस गुंजियाल यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस उपअधीक्षक आणि संशयित अभिषेक तिवारी हे माजी मंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करण्यासाठी ६ एप्रिल रोजी मुंबईत आले होते.

दरम्यान, डागा यांच्या अटकेनंतर त्यांना बुधवारी मध्यरात्री मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना दिल्लीत नेण्यात आले. गुरुवारी दुपारी डागा व तिवारी यांना दिल्लीतील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी दिली. तिवारी यांनी डागा यांच्यासह काही अज्ञात लोकांसोबत गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचला आणि सीबीआयचा तपास भरकटवण्यासाठी या प्रकरणातील संवेदनशील आणि गोपनीय कागदपत्रे वकिलाला पुरवली. स्वत:साठी गैरवाजवी फायदा आणि लाच मिळवण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.