२०२२ मध्ये होणार प्रदर्शित रानू मंडल यांचा बायोपिक; हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत


सध्याच्या घडीला सोशल मीडिया हे एक असे माध्यम ज्याठिकाणी प्रत्येक व्यक्ती व्यक्त होत असतो. त्यातच या सोशल मीडियामुळे अनेकांना रातोरात स्टार केले आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे रानू मंडल. रेल्वे स्टेशनवर गाणे गात असलेला रानू मंडल यांचा व्हिडीओ तर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या लोकप्रिय झाल्या होत्या.

लता मंगेशकर यांचे ‘एक प्यार का नगमा है’ गाणे रानू मंडल यांनी गायले होते. त्यांचा हा व्हिडीओ नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केल्यानंतर बॉलिवूडचा लोकप्रिय संगीतकार-गायक हिमेश रेशमियाने रानू मंडल यांना संधी दिली. हिमेशसोबत एकदा काम केल्यानंतर रानू गायब झाल्या. आता त्यांच्या बायोपिकची चर्चा सुरु असल्याचे सांगितले जाते.

सध्या बॉलीवूडमध्ये रानू यांच्या आयुष्यावर चित्रपटाची तयारी सुरु असून ‘मिस रानू मारिया’ असे चित्रपटाचे नाव असणार आहे. तर ऋषिकेश मंडल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटात रानू यांची भूमिका बंगाली आणि हिंदी चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री इशिका डे साकारणार आहे. तर ‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इशिकाने सांगितले की चित्रपटाचे चित्रीकरण कोलकाता आणि मुंबईमध्ये होणार आहे.

इशिका पुढे म्हणाली, मला माझ्या दिग्दर्शकांनी सांगितले की हिमेशला त्यांनी याविषयी विचारले आहे. हिमेशने अजून तरी होकार किंवा नकार दिलेला नाही. परंतू ते हो बोलतील अशी आशा आहे. चित्रपटासाठी मी खूप उत्साहित आहे, पण आधी मला चित्रपटासाठी २ महिन्यात १० किलो वजन कमी करावे लागेल.