राजू शेट्टींचा राष्ट्रवादीला करेक्ट कार्यक्रमाच्या पलिकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा


सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेला विधान परिषदेची एक जागा देणे ही काही कोणाची दया नाही, स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीमध्ये झालेला तो समझोता आहे. आता केलेला समझोता पाळायचा की पाठीत पुन्हा धारदार खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचे असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून आम्ही कधी गेलो नव्हतो. करेक्ट कार्यक्रमाच्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन असा इशाराही राष्ट्रवादीला राजू शेट्टींनी दिला. मी एकदा निर्णय घेतला की मागे हटत नाही, जलसमाधी आंदोलन होणार असल्याचेही ते म्हणाले.

राज्य सरकारने पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले आहे. राज्य सरकारकडून त्यांच्या या पदयात्रेच्या चौथ्या दिवशी देखील कोणताही निर्णय नाही झालेला. या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले, तर सरकारला महागात पडेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

महाविकास आघाडीचा मी गुलाम नाही, जिथे महाविकास आघाडी सरकार चुकत आहे, तिथे मी सरकारविरोधात ठामपणाने बोलणार. सरकार पूरग्रस्तांना मदत देताना चुकले आहे, मी पॅकेज देणारा माणूस नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण, पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही, असा राज्य सरकारला घरचा आहेर राजू शेट्टींनी या आधीच दिला होता.