नायर रूग्णालय शतकपूर्ती सोहळा; मुख्यमंत्र्यांकडून डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई महापालिकेच्या नायर रूग्णालयाचा शतकपूर्ती सोहळा आज साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी कोरोनाकाळात रूग्णालयाने केलेल्या कामासह डॉक्टर्स व समस्त आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेचे जाहीरपणे कौतुक केले. तसेच, जिद्दीचे नायर रूग्णालय हे मूर्तीमंत उदाहरण असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवले.

आपल्या भाषणात यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, जेव्हा आशीर्वाद प्रत्यक्ष रुपात आणणारी संस्था शतायुषी होते, तेव्हा एक समाधान काही वेगळच असते. मी केवळ कौतुक करू शकतो, शुभेच्छा देऊ शकतो, अभिनंदन करू शकतो. पण जो एक लघूपट आता दाखवला गेला, या संस्थेच्या स्थापनेचा आणि तिथपासून ते आतापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा आहे. काही वेळेला अशाही गोष्टी घडतात की सुरूवात होते, पण ती गोष्ट टिकवणे फार कठीण असते.

मला आज अभिमान आहे की या संस्थेने त्या प्रतिकुल काळात केलेले काम म्हणजे जिद्द असेल तर काय होऊ शकते याचे हे एक मूर्तीमंत उदाहरण आहे. जिद्द हवी, जिद्दच नसेल तर सगळ्या गोष्टी असूनही काही उपयोग नाही. जिद्द असेल तर काही नसले, तरी सर्वकाही करता येऊ शकते हे या संस्थने प्रत्यक्ष दाखवलेले आहे. ही संस्था निर्माण केल्यानंतर स्वतः जीव ओतून इतरांना जीवदान देणे. मागील १०० वर्षात येथील डॉक्टरांनी व त्यांच्या बरोबरीने सर्व परिचारिका, वॉर्डबॉय रूग्णालयाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी हे फार महत्वाचं काम अहोरात्र मेहनतीने केले.

तसेच, मागेही मी असे म्हटले होते की जेव्हा लॉकडाऊनची सुरूवात झाली, तेव्हापासून मंदिरे बंद आहेत. प्रार्थनास्थळं बंद आहेत. मग देव आहे कुठे? आणि तेच माझे म्हणणं आजही आहे. देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता हा डॉक्टरांच्या रुपाने आपल्या सोबत, आपला जीव वाचवण्यासाठी आलेला आहे. हा खरा देव आहे, जो आपला जीव वाचवत आहे. हे रूग्णालय देखील एखाद्या मंदिरासारखेच आहे. जसे व्यथा घेऊन कुणी मंदिरात जाते, तसे कधीतरी दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन, त्रस्त होऊन अनेकजण येथे येतात आणि त्यांच्यापैकी बहुतेकजण व्यवस्थित होऊन, हसतखेळत घरी जातात. हे तुमच्या सगळ्यांचे कर्तृत्व आहे, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवले.

तसेच कोरोनाच्या संकटकाळामध्ये या रूग्णालयाने काय काय केले? हे पुन्हा मी नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. पण खरच आहे की, हे आपले सरकार जेमतेम दोन-तीन महिने झाले असतील नसतील आणि त्यामध्ये हे अनपेक्षित व आज देखील अनाकलनीय म्हणजे काही कळतच नाही. असे संकट आले, व्हायरस सुरूवातीचे दिवस काय नंतरचे दिवस काय कठीणच होते. पण विशेषता सुरूवातीच्या दिवसांमध्ये एक अशी प्रचंड दहशत होती, की काही वेळेला डॉक्टर देखील रूग्णांना तपासायला घाबरत होते. आज सगळे ठीक आहे, मुंबई मॉडेलचे आज कौतुक होत आहे, महाराष्ट्राचे कौतुक होत आहे, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचे कौतुक होत आहे. पण मी नम्रपणाने प्रत्येक वेळी सांगतो, तेच आजही सांगत आहे, की या कौतुकाचे खरे मानकरी आपण सर्व डॉक्टर्स आणि आपले आरोग्य कर्मचारी असल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.