मुंबईतील युट्यूबरला ५० लाखांच्या गांजासह अटक


मुंबई – एका युट्यूब चॅनेलच्या दिग्दर्शकाला मुंबई पोलिसांनी अटक केली असून तब्बल एक किलो गांजा (मनाली चरस) त्याच्याकडे सापडला असून त्याची एकूण किंमत ५० लाख एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ४३ वर्षीय गौतम दत्ताला मुंबई क्राइम ब्रांचच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत अटक केली. ही अटकेची कारवाई अंधेरीमध्ये करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

जुहू-वर्सोवा लिंक रोडवर गौतम दत्ता वास्तव्यास असून तो एक युट्यूब चॅनेल चालवतो. या चॅनेलचा तोच दिग्दर्शकही आहे. बॉलिवूडशी त्याचे संबंध असून अनेकांना अंमली पदार्थ पुरवत असल्याचा संशय असल्याचे अधिकाऱ्याने म्हटले आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी (अंमलीपदार्थ विरोधी पथक) दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी जुहू-वर्सोवा लिंक रोडवर गस्त घातली जात असताना संशय आल्यामुळे गौतम दत्ताला अटक करण्यात आली. गौतम दत्ताची तपासणी केली असता यावेळी त्याच्याकडे ५० लाख किंमतीचा एक किलो गांजा सापडल्याची माहिती दत्ता नलावडे यांनी दिली आहे. याप्रकरणी अद्याप तपास सुरु आहे.