भारताच्या मनीष नरवालने शूटिंगमध्ये जिंकले सुवर्णपदक तर सिंहराजला रौप्यपदक


टोकियो : भारताच्या टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात सोनेरी झाली आहे. भारताला 50 मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदकासह रौप्यपदक देखील मिळाले आहे. 50 मीटर एअर पिस्टलमध्ये भारताच्या मनीष नरवालने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे, तर याच प्रकारात सिंहराजने रौप्यपदक मिळवून दिले आहे. याआधी सिंहराज अधानाने कांस्य पदकाची कमाई केली आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तुल P1 प्रकारात अधानाने कांस्य पदकावर आपले नाव कोरले होते. त्याने आता रौप्यपदक जिंकून आपले दुसरे पदक निश्चित केले आहे.

भारताच्या खात्यात आता आणखी दोन पदकाची भर पडली असून आता भारताच्या खात्यात एकूण 15 पदके जमा झाली आहेत. भारताला या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक मनीष नरवालने जिंकून दिले आहे. हरियाणाच्या कथुरा गावातील या 19 वर्षीय मनीषने पहिल्या दोन शॉटमध्ये 17.8 स्कोर केला होता. पण त्यानंतर त्याने शानदार वापसी केली. पाच शॉटनंतर मनीष नरवाल टॉप थ्रीमध्ये आला. पाच शॉटनंतर त्याचा स्कोर 45.4 होता, तर 12 शॉटनंतर मनीषचा स्कोर 104.3 होता.