जावेद अख्तर यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर चंद्रकांत पाटील यांची टीका


जालना – जगभरातील राजकारण तालिबानच्या मुद्द्यावरून तापत असतानाच भारतातही या मुद्द्यावरून सध्या विविध प्रतिक्रिया येत असून त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी नुकतेच यावर मत मांडले आहे. पण यावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

जावेद अख्तर यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे आहेत. दरम्यान, यावरून आता टीका-टिपण्ण्याचे सत्र सुरु झालेले असतानाच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रकांत पाटील हे आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना चंद्रकांत पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुराष्ट्र जावेद अख्तर यांना कळलेलेच नाही. दरम्यान, आपल्या मुलाखतीदरम्यान जावेद अख्तर म्हणाले होते कि जगभरातील उजव्या विचारसरणीच्या लोकांना हेच हवे आहे. ज्याप्रमाणे तालिबानला इस्लामिक राज्य हवे आहे, त्याचप्रमाणे येथे अनेकांना हिदू राष्ट्र हवे आहे. हे सर्व एकाच विचारसणीचे आहेत. मग ते मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू किंवा हिंदू असो.