हे गाव आहे वीर जवानांचे आणि आशियातील सर्वात मोठे

आशिया खंडातील सर्वात मोठे गाव उत्तरप्रदेशच्या गाजीपूर जिल्यात असून या गावाचे नाव आहे गहमर. हे गाव फौजी गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे. साधारण १.२० लाख लोकसंख्येच्या या गावात घरटी किमान एक भारतीय सेनेत आहे. काही कुटुंबात तर पाचवी पिढी सुद्धा भारतीय सेनेत असून अगदी जवानांपासून कर्नलच्या हुद्द्यावर येथील तरुण देशसेवेत कार्यरत आहेत. ६१८.३३ हेक्टरचे क्षेत्रफळ असलेले हे गाव ‘फौजीयोंका गाव’ या नावाने देशभर प्रसिद्ध आहे.

सिकरवाल वंशीय राजपूत राजाने १५३० मध्ये हे गाव वसविले असे सांगतात. १९६५, १९७१ च्या युद्धात मोठ्या संखेने या गावातील जवानांनी पराक्रम गाजविला आहे. या जवानांची आठवण आजही विसरली गेलेली नाही. आजच्या घडीला या गावातील १० हजार तरुण भारतीय लष्करात आहेत आणि १४ हजार माजी सैनिक या गावात वास्त्यव्याला आहेत.

केवळ सैनिकांचे नाही तर मोठ्या मनाच्या लोकांचे गाव म्हणूनही हे गाव प्रसिद्ध आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश सेनेत या गावातील २५० सैनिक सामील होते आणि त्यातील २१ शहीद झाले होते. या गावात दोन महाविद्यालये, दहा शाळा आणि चार एटीएम आहेत. हे गाव साहित्यिकांचे गाव म्हणूनही ओळखले जाते. गोपालदास गहमर, भोलानाथ गहमर, प्रदीप पांडे असे साहित्यिक याच गावाचे आहेत.