तासाला ११०० रुपये देऊनही मॅकडोनल्डला मिळेनात कामगार

गेल्या चाळीस वर्षात प्रथमच फेमस बर्गर हाउस मॅकडोनल्डला कामगारांची चणचण जाणवत आहे. त्यामुळे तासाला ११०० रुपये पगार देण्याची तयारी दाखवून सुद्धा कंपनीला पुरेश्या प्रमाणात कर्मचारी उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. अमेरिकेच्या ओरेगोन स्थित फ्रेंचायजीला स्टाफची कमतरता भासत असल्याने १४ वर्षे पूर्ण केलेल्या मुलांनाही नोकरी देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

अमेरिकेच्या श्रम कायद्यानुसार १४-१५ वर्षाची मुले खाद्य सेवा नोकरी करू शकतात. त्यासाठी त्यांच्या शाळेवर परिणाम जाणवू नये इतकेच तासांचे काम देण्याचे बंधन कंपनीवर असते. मेडफोर्ड रेस्टॉरंटचे संचालक हिथर केनेडी म्हणाले, यापूर्वी कामगारांची टंचाई कधीच जाणवली नव्हती. मात्र आता पगार वाढवून सुद्धा काम करण्यास लोक उत्सुक नाहीत. जाहिरात दिल्या नंतर १६ वर्षाच्या वरील २५ अर्ज जेमतेम आले आहेत.

केवळ मॅकडोनल्डच नव्हे तर बर्गर किंग, वेंडी या कंपन्यांना सुद्धा कामगार कमी पडत असून त्यानीही १४-१५ वयोगटातील मुलांची भरती करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. पण त्यानाही हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही.