चलनी नोटांमध्ये का आणि कशी घातली जाते मेटॅलिक स्ट्रिप

आज अनेक देश त्यांच्या चलनी नोटांमध्ये धातूचा धागा किंवा मेटल स्ट्रिप घालतात. कागदी नोटामध्ये धातूचा हा धागा का आणि कसा घातला जातो यामागचे कारण जाणून घेणे रोचक ठरेल. असा धागा, सुरक्षा मानके अधिक मजबूत करण्यासाठी घालण्याची प्रथा सुरु झाली ती प्रथम १८४८ मध्ये इंग्लंड येथे.

बनावट नोटा सहज बनविता येऊ नयेत हा त्यामागचा खरा उद्देश होता. या नव्या तंत्राचे पेटंट सुद्धा घेतले गेले. पण त्यानंतर त्याचा प्रत्यक्षात वापर सुरु झाला तो १०० वर्षानंतर. म्हणजे १९४८ मध्ये. द इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी म्हणजे आयबीएनएस बँक ऑफ इंग्लंड साठी सर्वप्रथम याचा वापर केला. त्यावेळी चलनी कागदी नोटे मध्ये काळा धागा घातला गेला. प्रकाशात धरल्यावर हा धागा दिसत असे आणि त्यामुळे नोट खरी असल्याची खात्री पटत असे. नकली नोटा बनविनारे असा धागा घालू शकणार नाहीत असा त्यावेळी समज होता पण तो लवकरच खोटा ठरला.

१९८४ मध्ये बँक ऑफ इंग्लंडने २० पौंड नोटेत ब्रोकन मेटल धागा वापरला पण त्यावरही नकली नोटा बनविणाऱ्यांची अक्कल भारी पडली. तेव्हा धातूच्या धाग्यावर काही अक्षरे लिहिली गेली. याची कॉपी मात्र आजपर्यंत होऊ शकलेली नाही. १९९० पासून अनेक देशांनी आपल्या चलनी नोटांची सुरक्षा अधिक मजबूत बनविण्यासाठी मेटल आणि प्लास्टिक स्ट्रिप त्यावर काही नंबर किंवा अक्षरे घालून नोटे मध्ये बसविण्याची पद्धत विकसित केली.

२००० साली भारतात रिझर्व्ह बँकेने १ हजाराची नोट चलनात आणली. त्यात ब्रोकन मेटेलिक स्ट्रिप आणि त्यावर हिंदी मध्ये भारत आणि आरबीआय ही अक्षरे घातली गेली. २००० च्या नोटेवर सुद्धा अशीच अक्षरे उलट्या क्रमाने होती. नंतर ५००, १०० च्या नोटांमध्ये त्याचा वापर सुरु झाला. आता ५, १०, २०, ५०, १००, २०० च्या नोटांवर सुद्धा अशी स्ट्रिप आहे.

ही स्ट्रिप अतिशय पातळ आणि धातू किंवा प्लास्टिक पासून बनविली जाते. ही स्ट्रिप खास तंत्रज्ञान वापरून नोटे मध्ये प्रेस केली जाते. फार थोड्या कंपन्या अश्या स्ट्रिप बनवितात. भारत अश्या स्ट्रिप आयात करतो.