अफगाणींसाठी औषधे, खाद्यान्न घेऊन युएईचे विमान काबुलमध्ये दाखल

तालिबानची सत्ता अफगाणिस्थानमध्ये स्थापन होत असताना तेथील सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाल्याचे दृश्य दिसत आहे. आवश्यक औषधे आणि अन्न धान्याची प्रचंड कमतरता भासू लागली आहे. अश्या वेळी संयुक्त अरब अमिराती (युएई) ने पहिली इमर्जन्सी कार्गो फाईट काबुल ला रवाना केली आहे. यातून आवश्यक औषधे आणि खाद्यान्न पाठविले गेल्याचे सांगितले जात आहे. या प्रकारे मदत पाठविणारा युएई पहिला देश बनला आहे.

१९९६ ते २००१ या काळात अफगाणिस्थानवर तालिबानने कब्जा केला होता तेव्हा त्यांना मान्यता देणाऱ्या तीन देशात युएईचा समावेश होता. त्यावेळी युएई, पाकिस्तान आणि सौदीने त्यांना मान्यता दिली होती. सध्या तालिबान पुन्हा सरकार स्थापनेच्या गडबडीत आहे. गेले तीन आठवडे तालिबान अफगाणिस्थान मध्ये पाय रोवून आहे. अश्यावेळी अफगाणी बंधुंसाठी मानवी आधार मदत म्हणून वरील सामग्री पाठविली गेली आहे आणि यापुढेही पाठवू असे युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

अफगाणिस्थान मधून जेव्हा बाकीचे देश त्यांच्या नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम राबवत होते तेव्हाही युएईने त्यांच्या देशात फ्लाईट्स थांबवून या नागरिकांना थांबण्याची आणि नंतर फ्लाईट पकडून मायदेशी परतण्याची परवानगी दिली होती. त्यावेळी अनेक परदेशी नागरिक दुबई, आबूधाबी येथे ब्रेक घेऊन मायदेशी परतले होते.