मुंबईतील दोन प्रमुख क्रीडा संकुलांच्या खासगीकरणाला नितेश राणेंचा विरोध


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भाजप आमदार नेते नितेश राणे यांनी तक्रार केली आहे. महापौरांच्या निटवर्तीय अधिकाऱ्याने शहरामधील दोन प्रमुख क्रीडा संकुलांचे खासगीकरण करण्याचा घाट घातल्याचा आरोप या पत्रामधून नितेश राणेंनी केला आहे. तसेच हे खासगीकरण थांबवण्यात यावे नाहीतर, आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशाराही नितेश राणेंनी दिला आहे.

नितेश राणेंनी मुलुंडमधील ललित कला प्रतिष्ठान आणि अंधेरीमधील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलाच्या खासगीकरणाला विरोध केला आहे. नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात एक पत्रच लिहिले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला असून त्यांनीच मुंबईकरांना जलतरण आणि बाग यासारख्या सेवा मिळाव्यात म्हणून या सोयी उपलब्ध करुन दिल्या होत्या, असे म्हटले आहे.

मराठी माणूस बाळासाहेबांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कायमच होता. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. त्याच उद्देशाने सर्वसामान्यांना जलतरण तलाव, बाग यासारख्या सोयी मिळाव्यात म्हणून मुंबई कला प्रतिष्ठानची स्थापना केली. पण बाळासाहेबांनी स्थापन केलेले हे प्रतिष्ठान आता भ्रष्टाचाराचे केंद्र झाले असल्याचा संताप सामान्य नागरिकांमध्ये व्यक्त होत असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.

तसेच नितेश राणे यांनी या पत्रामध्ये पुढे भ्रष्टाचाराचेही आरोप केले आहेत. या दोन्ही क्रीडा संकुलांचा कारभार हा पारदर्शक नसल्याचा आरोप नितेश राणेंनी पत्रातून केला आहे. असे असतानाच महापौरांचे निकटवर्तीय अधिकारी असणाऱ्या देवेंद्रकुमार जैन यांच्या हस्तक्षेपाने या दोन्ही क्रीडा संकुलांच्या खासगीकरणाचा घाट घातला जात असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला आहे. ही खासगीकरणाची प्रक्रिया थांबवण्यात यावी अशी मागणी नितेश राणेंनी पत्रातून केली.

तसेच या पत्रात हे खासगीकरण झाल्यास या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्यास त्यांना घेऊन आपण रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असेही नितेश राणे म्हणाले आहेत. तसेच पत्रामध्ये या क्रीडा संकुलांमधील जलतरण तलाव नफ्यामध्ये असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हे जलतरण तलाव नफ्यात असतानाच त्याचे खासगीकरण करण्याची काय गरज असल्याचा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. नफ्यात चालणाऱ्या तरणतलावाचे खासगीकरण कशासाठी आणि कुणासाठी केले जात असल्याचा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे.

दरम्यान नितेश राणेंच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तर देतात का किंवा किशोरी पेडणेकर यासंदर्भात प्रतिक्रिया देतात का यावरुनच या प्रकरणामध्ये पुढे काय होणार याचा अंदाज बांधता येईल.