काल दिवसभरात 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर 366 रुग्णांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशात सध्याच्या घडीला जवळपास 45 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, काल दिवसभरात देशात 45,352 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर 366 रुग्णांनी जीव गमावला आहे. तसेच 34,791 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनामुक्त रुग्णांहून जास्त दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून आतापर्यंत चार लाखांपर्यंत पोहोचली आहे. दरम्यान कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 29 लाख 3 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे 3 कोटी 20 लाख 63 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाख आहे. एकूण 3 लाख 99 हजार 778 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 4,342 कोरोनाबाधितांची रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 81 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 97. 04 टक्के झाला आहे. तर काल दिवसभरात राज्यात 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा डेथ रेट 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

काल दिवसभरात मुंबईत 441 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 205 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,155 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर काल दिवसभरात मुंबईत तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3418 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर गेला आहे.