पृथ्वीबाहेर अशी झाली पहिली आईसक्रीम पार्टी
नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थर यांनी त्यांचा ५० वा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सोमवारी साजरा केला असून त्यानिमित्ताने पहिलीच आईसक्रीम पार्टी अंतराळ स्थानकात साजरी झाली. मेगन यांनी ट्विटरवर त्या संदर्भातले ३ फोटो शेअर केले आहेत. ट्विटर वर मेगन यांचे ५० हजार फॉलोअर्स आहेत.
मेगन म्हणतात, मला खूप आनंद झाला. यापूर्वी कधीच माझ्यासाठी कुणी स्पेस शिप पाठविले नव्हते. एक्सपिडीशन ६५ च्या चालक दल सहकाऱ्यांबरोबर बर्थ डे साजरा करते आहे. डिनर, केक आणि आईस्क्रीम असा मस्त बेत आहे. मेगन पृथ्वीपासून २६० मैल दूर असलेल्या अंतराळ स्थानकात एप्रिल मध्ये पोहोचली आहे. स्पेस एक्सच्या ड्रॅगन रॉकेटने या स्टेशनवर २१६० किलो सामानाची डिलीव्हरी नुकतीच पोहोचवली असून त्यात ताजी फळे, अवाकाडो, लिंबे, आईस्क्रीम व अन्य काही सामान होते. ड्रॅगन कार्गो शिपची आत्तापर्यंतची सर्वात मोठी डिलीव्हरी आहे.
नासाच्या माहितीप्रमाणे अंतराळ स्थानकात वाढदिवस साजरा करणारा पहिला अंतराळवीर सोविएतचा व्हिक्टर पॅटसॅव असून त्याने १९ जून १९७१ मध्ये त्याचा ३८ वा वाढदिवस अंतराळ स्थानकात साजरा केला होता. अंतराळात वाढदिवस साजरा करणारा पहिला अमेरिकन अंतराळवीर चार्ल्स पेटे कॉनराड हा आहे. त्याने २ जून १९७३ मध्ये स्कायलॅब मध्ये त्याचा वाढदिवस साजरा केला होता. जेनेट कावंडी ही अंतराळस्थानकात वाढदिवस साजरा करणारी पहिली महिला अंतराळवीर आहे. तिने १७ जुलै २००१ या दिवशी अंतराळ स्टेशनमध्ये वाढदिवस साजरा केला होता.