पाक मंत्र्यांची अजब कृती, दातानेच तोडली उद्घाटन फीत

पाकिस्तानात सर्वसामान्य माणसापासून बड्या नेत्यांपर्यंत सतत काही काही ना काही कारनामे केले जातात आणि त्यातील अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पंजाब प्रांताचे जेल मंत्री फैयाज अल हसन चौहान सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फैयाज यांनी नव्या पद्धतीने केलेल्या उद्घाटनाची जोरदार चर्चा सुरु असून त्यामुळे अनेकांचे मनोरंजन होत आहे.

पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे नेते फैयाज याना एका शो रूमच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते. तेथे उद्घाटनासाठी बांधतात तशी फीत किंवा रिबन बांधलेली होती. ही रिबन कापून उद्घाटन करायचे होते. फोटो मध्ये फैयाज यांच्या शेजारी एक व्यक्ती एका तबकात कात्री घेऊन उभी असलेली दिसत आहे. व्हिडीओ ऑन होताच मंत्रीमहोदयाने कात्री उचलून फीत कापण्याचा प्रयत्न केला पण कात्रीला धार नसल्याने दोन तीन वेळा प्रयत्न करूनही फीत कापली गेली नाही. शेवटी फैयाज यांनी दातांनी चावून फीत तोडली. फैयाज यांची ही देशी स्टाईल एकदम व्हायरल झाली असून पाकिस्तान डेलीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे.

फैयाज हे पाकिस्तानचे जेल मंत्री आणि प्रवक्ते आहेत. २०१९ मध्ये यांनीच हिंदूंबद्दल अवमानास्पद टिपण्णी केली होती आणि त्याबद्द्दल त्यांना माहिती आणि सांस्कृतिक मंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी त्यांना माफी देऊन जेल मंत्री बनविले आहे.