‘या’ कंपनीने बनवला ‘वर्क फ्रॉम होम’ दरम्यान सिगारेट न ओढण्याचा नियम


जपान – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अनेक कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कर्मचारीही घरातून काम करण्याला पसंती देत आहे. रोज ऑफिसला टापटिप कपड्यात जाणारे कर्मचारी आता कम्फर्टेबल कपड्यात घरून काम करत आहेत. तसेच घरात सहज वावरतानाही अडचण येत नाही.

पण जरी असे असले, तरी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जपानच्या एका कंपनीने अजब आदेश जारी केला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या सिगारेट ओढण्यावर जपानी ब्रोकरेज फर्म नोमुराने बंधने आणली आहेत. तुम्ही ऑफिसमध्ये असा किंवा वर्क फ्रॉम होम करत असाल. कामाच्या वेळेत तुम्हाला सिगारेट ओढता येणार नाही. कंपनीने हा नियम कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने बनवला असल्याचे कंपनीने आपल्या आदेशात म्हटले आहे.

ऑक्टोबरपासून कंपनीचा हा नियम लागू होणार आहे. तर कंपनीने डिसेंबरपर्यंत ऑफिसमधील स्मोकिंग रुम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. पण कर्मचाऱ्यांवर देखरेख कशी ठेवणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. हा नियम कंपनी आणि कर्मचारी यांच्यातील विश्वासावर आधारित असेल आणि त्यासाठी कर्मचाऱ्यांना कोणताही दंड केला जाणार नसल्याचे प्रवक्ते योसिटॅका ओत्सु यांनी सांगितले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. जेणेकरून कामाचे योग्य वातावरण निर्माण होईल. कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहील आणि त्यांना धूम्रपानापासून मुक्तता मिळेल.

दुसरीकडे, लंच ब्रेक दरम्यान एखादा कर्मचारी बाहेर जाऊन सिगारेट ओढत असेल तर त्याला जागेवर परत येण्यासाठी किमान ४५ मिनिटांचा अवधी लागतो. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांच्या कामावर त्याचा परिणाम होतो, असे देखील म्हणणे कंपनीने मांडले आहे. तसेच २०२५ सालापर्यंत कंपनीतील कर्मचाऱ्यांचे धूम्रपानाचे प्रमाण १२ टक्क्यांवर आणण्याचा मानस आहे. यासाठी कंपनीने २०१७ पासून धोरण बनवले आहे. तसेच धूम्रपान सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना आर्थिक प्रोत्साहनही दिले जाणार आहे.