अफगाणिस्तानमध्ये अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार तालिबानी सरकार; शिक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री पदाची दहशतवाद्यांकडे जबाबदारी


काबूल – सत्ता स्थापनेच्या हलचालींना अफगाणिस्तानमध्ये वेग आला असून देशावर १६ ऑगस्ट रोजी ताबा मिळवल्यानंतर अमेरिकन सैन्य माघारी गेल्यावर आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी आणि नवीन मंत्रीमंडळ बनवण्यासाठी तयारी सुरु केली आहे. तालिबानला किमान तीन दिवसांचा अवधी सर्व सहकारी गटांना एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी लागणार आहे. तालिबानकडून सत्ता स्थापनेसंदर्भात तीन दिवसांनंतर घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातील चर्चा तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे सदस्य बिलाल करीमीने संघटनेचा प्रमुख नेता हिबतुल्लाह अखुंदजादाच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर तालिबानचा प्रसिद्ध नेता मुल्ला अब्दुल गनी बरदारवर सरकारच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

पवित्र आणि सुशिक्षित लोकांचा नवीन सरकारमध्ये समावेश असेल आणि सरकारमध्ये मागील २० वर्षांपासून असणाऱ्यांना संधी दिली जाणार नसल्याची माहिती कतारमध्ये तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे उपप्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजईने दिली आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये महिलांनाही स्थान दिले जाईल, असेही अब्बास म्हणाले आहेत. अखुंदजादाच्या नेतृत्वाखालीच हे सरकार काम करणार असल्याचे संकेत तालिबानने दिले आहेत.

यासंदर्भात पाजव्होक या अफगाणिस्तानमधील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार तालिबानने सखउल्लाहकडे कार्यवाहक शिक्षा प्रमुख, अब्दुल बाकीला उच्च शिक्षण कार्यवाहक प्रमुख, सदर इब्राहिमला कार्यवाहक गृहमंत्री, गुल आगाला वित्तमंत्री, मुल्ला शिरीनला काबूलचा राज्यपाल, हमदुल्ला नोमानीला काबूलचा महापौर आणि नजीबुल्लाहला गुप्तहेर संघटनेचा प्रमुख म्हणून जबाबदारी दिली जाणार आहे. यापूर्वी संस्कृति आणि सूचना मंत्री म्हणून तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिदला नियुक्त करण्यात आले आहे.

१६ ऑगस्ट २०२१ रोजी अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर अनेक टॉप कमांडर आणि महत्वाचे नेते एक एक करुन देशाच्या राजधानीमध्ये दाखल होऊ लागले आहेत. यामध्ये मागील अनेक वर्षांपासून फरार घोषित करण्यात आलेल्या तालिबानच्या अनेक नेत्यांचा समावेश आहे. पण असे असतानाही एका व्यक्तीबद्दल अद्यापही कोणतीच माहिती समोर आलेली नाही. ती व्यक्ती म्हणजे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबातुल्लाह अखुंदजादा. अफगाणिस्तानमध्येच अखुंदजादा हा असून लवकरच तो पहिल्यांदाच जनतेसमोर येईल, असे तालिबानने स्पष्ट केले आहे.

याबाबत एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानचा मुख्य प्रवक्ता जबनुल्लाह मुजाहिदने कंदाहारमध्ये अखुंदजादा हा असल्याची माहिती दिली आहे. सुरुवातीपासून अखुंदजादा हा येथेच वास्तव्यास असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच आता देशामध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर हिबातुल्लाह पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या जगासमोर येणार आहे. संघटनेमध्ये अखुंदजादा हा कमांडर पदावर असून २०१६ पासून तो तालिबानचे नेतृत्व करतो आहे. तालिबान ज्यावेळेस संपुष्टात येत असल्याचे वाटत होते, तेव्हाच अखुंदजादाच्या हातात संघटनेचे नेतृत्व आले. या संघटनेची त्याने बांधणी करुन अखेर अफगाणिस्तानच्या सैन्याला पराभूत करत देशात पुन्हा एकदा तालिबानचे राज्य आणण्यामध्ये मोलाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.

अफगाणिस्तानमध्ये मागील पाच वर्षांपासून अखुंदजादाबद्दल गूढ कायम आहे. येथील लोकांना त्याच्याबद्दल फारच कमी माहिती असून देशाला संघर्षाच्या खाईत ढकलणाऱ्या तालिबानच्या या मुख्य नेत्याची दहशत फार आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये अखुंदजादा दिसत नाही. केवळ इस्लाममधील महत्वाच्या दिवसांना त्याचा एखादा संदेश तालिबानच्या माध्यमातून जारी केला जातो. तालिबाननेच अखुंदजादाचा एक फोटो जारी केला होता. त्या फोटो व्यतिरिक्त अखुंदजादाबद्दल कोणतीही कागदपत्रं किंवा इतर माहिती उपलब्ध नाही. अखुंदजादा कधीच जनतेच्या समोर आलेला नसल्याचे सांगितले जाते. देशातील सत्ता ऑगस्टमध्ये काबीज केल्यानंतरही तालिबानने अखुंदजादाबद्दलचे गूढ अद्याप कायम ठेवले आहे. एकीकडे काबूलमधील मशिदींमध्ये तालिबानला मदत करणाऱ्या वेगवेगळ्या गटांचे नेते मोकळेपणे आपआपल्या गटांचा प्रचार करत असताना ज्यांनी सत्ता मिळवली, त्या तालिबानचा म्होरक्या अद्यापही भूमिगत आहे.

आपल्या प्रमुख नेत्याबद्दल तालिबानने अशी गुप्तता बाळगण्याचा इतिहास फार जुना आहे. अशाच गूढ हलचाली आणि सार्वजनिक जिवनामध्ये सहभागी न होण्यासाठी तालिबानचा संस्थापक मुल्ला मोहम्मद ओमर सुद्धा ओळखला जायचा. तालिबानने १९९० मध्ये पाहिल्यांदा सत्ता मिळवली, तेव्हा तो काबूलमध्येच राहायला होता, पण तो सार्वजनिकपणे फार कमी वेळा समोर यायचा. तालिबानच्या प्रतिनिधीमंडळाचीही ओमर भेट फार कमी वेळा घ्यायचा. तालिबानची कंदाहारमध्ये ज्या ठिकाणी स्थापना करण्याचा निर्णय झाला, तिथेच ओमर रहायचा. आजही ओमरचे शब्द हे तालिबान्यांकडून अलिखित कायद्याप्रमाणे मानले जातात. तालिबानमध्ये ओमर एवढा मोठा नेता अद्याप झालेला नाही.

अखुंदजादाने ओमरप्रमाणेच एकटे राहण्याचा निर्णय घेतला आहे. अखुंदजादा आधी तालिबानचा प्रमुख असणाऱ्या मुल्लाह अख्तर मंसूरचा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर अखुंदजादाने सुरक्षेच्या दृष्टीकोनामधून अशाप्रकारचे जीवन स्वीकारल्याचे आंतरराष्ट्रीय क्रायसेस समूहाचे आशियामधील प्रमुख लॉरल मिलर सांगतात. तालिबानच्या नेत्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना लवकरच त्यांचा मुख्य नेता म्हणजेच अखुंदजादा जगासमोर येणार असल्याचे म्हटले आहे. अखुंदजादा मरण पावला अशा बातम्या अनेकदा येऊन गेल्या असून त्या बातम्या खोडून काढण्यासाठी तो जगासमोर येण्याची शक्यता आहे. पण जगासमोर आल्यानंतर अखुंदजादावरही मंसूरप्रमाणे वेळ येईल अशी भीती व्यक्त केली जात असल्यामुळे तो जगासमोर येण्यासंदर्भात संभ्रमात असल्याचे सांगितले जाते.

मागील अनेक वर्षापासून अखुंदजादा हा कुठे आहे याबद्दलची माहिती नसल्यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्येही तो दिसून न आल्याने वेळोवेळी त्याच्याबद्दलच्या अनेक बातम्या समोर आले. अखुंदजादाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे काहींनी सांगितले, तर काहींनी तो बॉम्ब हल्ल्यात मेल्याचा दावा केला. पण पुराव्यानिशी हे सर्व दावे सिद्ध करता आले नाही. अखुंदजादाने आपली गोपनियता नाजूक काळामध्येही कायम ठेवण्यात यश मिळवले. अनेक वर्षे २०१५ मध्ये तालिबानने त्यांचा प्रमुख नेता मंसूरचा मृत्यू झाल्याचे लपवून ठेवल्यानंतर अखेर जाहीर केले. यानंतर तालिबानमध्ये सत्तेसाठी अंतर्गत कलह निर्माण झाला. या रक्तरंजित संघर्षामुळे तालिबानमध्ये फूट पडू लागली. पण त्यानंतर नेतृत्व करणाऱ्या अखुंदजादाने तालिबानला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले. आता सत्ता आल्यानंतर तालिबानला मदत करणाऱ्या लहान मोठ्या गटांबरोबर सामंजस्य वाढवण्यासाठी तालिबान आणि अखुंदजादा प्रयत्न करतील, असे सांगितले जात आहे. हे काम आव्हानात्मक असल्याचे अफगाणिस्तानसंदर्भातील जाणकार सांगतात.

तालिबानमधील अंतर्गत संघर्षाला सत्तेची हाव पुन्हा खतपाणी घालू शकते. त्यामुळे मागील अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेली सत्ता टीकवणे, अफगाणिस्तानमधील नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणे, यासारखी मुख्य आव्हाने आता तालिबान आणि अखुंदजादासमोर आहेतच, त्याचबरोबर तालिबानची एकजूट कायम कशी राहील, यासाठीही अखुंदजाला काम करावे लागणार आहे.