बिग बॉसच्या 13 व्या हंगामाचा विजेता अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन


मुंबई – बिग बॉसच्या 13 व्या हंगामाचा विजेता आणि छोट्या पडद्यावरील मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी निधन झाले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्याचे निधन हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे झाले आहे. परंतु मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. परंतु, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल. सिद्धार्थच्या निधनाच्या वृत्ताला मुंबईच्या कूपर रूग्णालयाने तसेच मुंबई पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

सिद्धार्थ बिग बॉसच्या तेराव्या हंगामाचा विजेता म्हणून नावारुपाला आला. त्याचबरोबर सिद्धार्थ खतरो के खिलाडी, फिअर फॅक्टर या रिअॅलिटी शोमधून झळकला होता. याव्यतिरिक्त बॉलिवूडमध्येही सिद्धार्थ झळकला होता. हम्प्टी शर्मा की दुल्हनिया या चित्रपटात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. सिद्धार्थच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

अद्याप सिद्धार्थच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे. हृदय विकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्याच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, असे सांगितले जात आहे. सिद्धार्थ शुक्ला 40 वर्षांचा होता. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थला हृदय विकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका बालिका वधुमधून सिद्धार्थ शुक्लाला खरी ओळख मिळाली. त्यानंतर सिद्धार्थने कधीच मागे वळून पाहिले नाही. दिल से दिल तक मालिकेतही तो झळकला होता. सिद्धार्थच्या निधनाची बातमी मिळताच मनोरंजन विश्वातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.