५४ वर्षांपूर्वी आजच्या दिवशी अमेरिकेत सुरु झाले होते पहिले एटीएम

जगातले पहिले एटीएम कुणी बनविले आणि ते सर्वप्रथम कुठे सुरु झाले या विषयी अनेक वाद आहेत. पण अमेरिकेतील पहिले एटीएम न्युयॉर्क शहरात २ सप्टेंबर १९६९ साली म्हणजे आजपासून बरोबर ५४ वर्षापूर्वी सुरु झाले यात मात्र काही वाद नाही.

यासाठी केली गेलेली जाहिरात मोठी कल्पक होती. केमिकल बँकेने रॉकव्हिले सेंटर येथे हे एटीएम सुरु केले होते आणि ते डोक्युवेल कंपनीचे डोन वेट्झेल यांनी तयार केले होते. वेटझेल यांनी १९७१ मध्ये त्याचे पेटंट केले होते. यावेळी केली गेलेली जाहिरात अशी होती,’ २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आमची बँक उघडणार आणि ती कधीच बंद होणार नाही.’ जाहिरात वाचून अनेक नागरिक भ्रमात पडले होते. त्याचा समज बँक चोवीस तास सुरु राहणार असा झाला होता.

हे पहिलेच एटीएम इतके यशस्वी झाले की पुढच्या पाच वर्षात डोक्युवेल कंपनीने एटीएम मार्केट मध्ये ७० टक्के हिस्सा मिळविला होता. या काळात अनेक देशात एकाचवेळी असे मशीन बनविण्याचे संशोधन सुरु होते.

१९६७ मध्ये लंडनच्या जॉन शेफर्ड बॅरन यांनी एटीएम बनविले होते. त्यातून पैसे काढण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चेकचा वापर करावा लागत असे. त्या एटीएम साठी सहा अंकी पिन होता नंतर तो चार अंकी करण्यात आला. पण या तंत्रज्ञानाच वापर हॅकर करतील या भीतीने जॉन यांनी पेटंट घेतले नव्हते. सुरवातीला एटीएम मधून फक्त कॅश काढता येत असे पण १९७१ पासून त्यात अकौंट डीटेल्स व अन्य काही कामे करण्याची सुविधा सुरु झाली.