सलमानने चित्रपटात वापरलेल्या टॉवेलचा दीड लाखाला लिलाव

बॉलीवूडचा दबंग खान सलमान याची लोकप्रियता आणि चाहते लाखोंच्या संख्येने आहेत. सलमानने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आजही त्याच्या प्रत्येक चित्रपटाला तुफान गर्दी होतेच पण २००४ साली प्रदर्शित झालेल्या त्याच्या मुझसे शादी करोगी या चित्रपटाचा विसर रसिकांना अजूनही पडलेला नाही. सलमानचे लग्न कधी आणि कुणाशी होणार याची प्रतीक्षा त्याचे चाहते करत आहेत. पण २००४ साली आलेल्या या चित्रपटातील एक गाणे,’ जीने के है चार दिन’ वेगळ्याच कारणाने पुन्हा चर्चेत आले आहे.

या गाण्यात सलमान खान याने वापरलेल्या एका टॉवेलचा नुकताच लिलाव करण्यात आला. या टॉवेलला चक्क १ लाख ४२ हजाराची बोली लागली. एका साधारण टॉवेलसाठी लागलेली ही बोली आपल्याला काहीच्या काही वाटेल पण सलमानचे चाहते सलमानशी संबंधित कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी कितीही किंमत मोजायला तयार असतात हे पुन्हा दिसून आले आहे. डेव्हिड धवन यांनी दिग्दर्षित केलेल्या या चित्रपटात सलमान सोबत अक्षयकुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्याही भूमिका होत्या.

बॉलीवूड कलाकारांनी वापरलेल्या वस्तूंचे लिलाव नवे नाहीत. लगान चित्रपटात आमीर खानने वापरलेली बॅट १ लाख ५६ हजारांना विकली गेली होती तर प्रियांका चोप्राने वापरलेला एक ड्रेस ५० हजाराला आणि पायातील हिल्स अडीच लाखाला विकल्या गेल्या होत्या. २०१२ मध्ये शम्मी कपूर यांचे जंगली चित्रपट वापरलेले जॅकेट ८० हजाराला विकले गेले होते. धक धक करने लगा गाण्यातील माधुरीच्या साडीला ८० हजाराची किंमत मिळाली होती तर माधुरीच्या देवदास मधील मार डाला गाण्यातील लेहंगा चक्क तीन कोटीना लिलाव झाला होता. अश्या लिलावातून मिळालेला पैसा धर्मादाय संस्थांना देणगी म्हणून दिला जातो असेही समजते.