विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या किंमतीत महिन्याच्या पहिल्याच दिवशी वाढ


नवी दिल्ली : सर्वसामान्य नागरिकांना नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका बसला असून घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग झाला आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत आज एक सप्टेंबरपासून 25 रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीनंतर आता दिल्लीत 14.2 किलो एलपीजी सिलेंडरची किंमत वाढून 884.50 रुपये एवढी झाली आहे. तत्पूर्वी सिलेंडरचे दर 18 ऑगस्ट रोजी 25 रुपयांनी वाढवण्यात आले होते.

14.2 किलो विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडर आता दिल्ली-मुंबईत 884.5 रुपयांना, तर कोलकात्यात 911 रुपये आणि चेन्नईत 900.5 रुपयांना विकण्यात येणार आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच नाही, तर 19 किलो असणारा कर्मशियल वापरासाठीचा सिलेंडरही महाग झाला आहे. दिल्लीत कर्मशियल वापरासाठीचा सिलेंडर 1618 रुपयांऐवजी 1693 रुपयांना विकत भेटणार आहे.

सिलेंडच्या किमतींमध्ये एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये 190 रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत एक जानेवारी रोजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता दर वाढ झाल्यानंतर 884.5 रुपयांवर पोहोचली आहे.

दरम्यान, दर महिन्याला एलपीजी सिलेंडरच्या किमतींची तेल कंपन्यां समिक्षा करतात. त्यानंतर किमती वाढवणे किंवा किंमतींमध्ये घट करणे यासंदर्भातील निर्णय घेण्यात येतो. प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्यामुळे गॅसच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळतो.